रत्नागिरी, (आरकेजी) : रत्नागिरी एसटी स्टँण्डसमोर आज झालेल्या विचित्र अपघातात भयानक थरार पहायला मिळाला. कुवारबावहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या वॅगनरने पाच वाहनांना चिरडत नेले. ऋषिकेश पाटणे हा वॅगनर हि गाडी चालवीत होता. ऋषिकेश हा भरधाव वेगाने गाडी चालवत होता. पहिल्यांदा त्याने जयस्तंभ परिसरातल्या एका दुचाकीला उडविले. कुवारबावपासून अतिशय वेगात तो रत्नागिरीच्या दिशेने निघाला होता. एसटी स्टँण्ड समोर आल्यानंतर त्यने गाडी रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या रेलिंगवर घातली. या ठिकाणाहून गाडी उडाली. त्यानंतर ताबा सुटलेल्या गाडीने समोर येईल त्या वाहनाला भरडत नेले. तीन दुचाकी आणि एक सुमो गाडीला धडक देवून वॅगनर थांबली.यात चार जण जखमी झाले. दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथून लगेचच त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
प्रकाश अनंत शिंदे(३६, कुवारबाव) यांची दुचाकी(एमएच ०८- ०२७९), ऋषिकेश रमेश नलावडे(रा. फणसोप) दुचाकी (एमएच ०८-२९३९), तर तस्लीम फाईक तांबू(३२, रा.आरोग्य मंदिर) दुचाकी (एमएच ०८ एजे ३६६७) या दुचाकींचा समावेश आहे. अपघातात प्रकाश शिंदे, ऋषिकेष नलावडे, तस्लीम तांबू आणि त्यांचा मुलगा महमद यासिम तांबू हे जखमी झाले. प्रकाश शिंदे, ऋषिकेश नलावडे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आषाढी एकादशीनिमित्त रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात मोठी गर्दी होती. दरम्यान अपघात घडल्याचे समजताच घटनास्थळी एकच गर्दी झाली. शिवसेनेचे प्रमोद शेरे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वॅगनर चालकाला देखील उपस्थित नागरिकांनी बेदम चोप दिल्याचे समजते. दारूच्या नशेत अपघात झाला कि गाडी चालकाची मानसिक स्थिती बिघडल्याने हा अपघात झाला याचा तपास पोलीस करत आहेत. ऋषिकेष पाटणे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.