
नागपूर : रेशन कार्ड नसलेल्यांनाही धान्य मिळणार अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लावून धरली होती. या प्रयत्नांना यश आले. त्यानुसार नागपूरच्या रेशनिंग ऑफिसमधून माहिती देण्यात आली. रेशन कार्ड नसलेल्यांची जी यादी आपण आमच्या कार्यालयाला सोपवलेली आहे त्यांनी जवळच्या रेशन दुकानात जाऊन फार्म भरावा व आवश्यक कागदपत्रे जोडल्यास त्यांना ताबडतोबीने धान्य देण्यात येईल, असे माकपला कळविण्यात आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मागील महिन्यात दिलेल्या तीन निवेदनाद्वारे स्थलांतरित कामगार व रेशन कार्ड नसलेल्यांना खाद्यान्नाचा पुरवठा करण्यात यावा, ही मागणी लावून धरली होती.
जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन दिल्यानंतर त्यांनी हे निवेदन महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे प्रेषित केले होते. महानगर पालिका आयुक्तांनी ताबडतोब पावले उचलून महानगरपालिके द्वारे चालवण्यात येणाऱ्या कम्युनिटी किचन मध्ये येऊन या सर्वांनी जेवण करावे याबाबत प्रयत्न केले. परंतु या स्थलांतरितांना महानगरपालिकेच्या किचनमध्ये जाऊन जेवण घेणे शक्य नव्हते. अखेरीस महानगरपालिकेने हे निवेदन जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कडे दिले.
महत्त्वाची बाब म्हणजे केंद्र सरकारने काढलेल्या अध्यादेशानुसार अशा सर्व स्थलांतरितांना शिजवलेले जेवण द्यावे याचा उल्लेख करण्यात आला होता. हा अध्यादेश खाद्यान्न पुरवठा न करता येण्यामागे मोठा अडसर होता. या अध्यादेशाचा मध्ये सुधार करण्यात आला की राज्य सरकार द्वारे हे पाऊल उचलले गेले हे अजून समजलेले नाही. परंतु आता मात्र स्थलांतरितांना किंवा रेशन कार्ड नसलेल्यांना तात्पुरत्या स्वरूपात का असेना खाद्यान्नाचा पुरवठा होईल, असे माकपकडून सांगण्यात आले.