पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या ओणी-अनुस्कारा रस्त्यात तब्बल 10 फुटाचे खड्डेरत्नागिरी, प्रतिनिधी : कोकणातील रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांमुळे सध्या जनता त्रस्त झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राला कोकणाशी जोडणाऱ्या राजापूर तालुक्यातील ओणी-अनुस्कारा रस्त्यात तर तब्बल 10 फुट लांबीचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झालेत. त्यामुळे या खड्ड्यांवरून मनसे आक्रमक झाली आहे. रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास अधिकाऱ्यांना कोंडून ठेवण्याचा इशारा मनसेनं दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आज मनसेनं पाचल भागात मोर्चा काढला. मनसेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश सौंदळकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.यावेळी रस्त्यांचा प्रश्न मार्गी न लागल्यास प्रसंगी अधिकाऱ्यांना कोंडून ठेवू असा इशारा दिला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणला जोडणारा आंबा घाट वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे अणुस्कुरा मार्गे सर्वच वाहतुक होत आहे. पण, अणुस्कुरा – पाचल – ओणी या रस्त्यांवर काही ठिकाणी 10 फुटाचे तर काही ठिकाणी पाच ते सात फुटाचे खड्डे आहेत. शिवाय, रस्त्यांची अवस्था पाहिल्यानंतर नक्की रस्ता आहे आहे कि खडकाळ पायवाट अशा प्रश्न पडावा अशी अवस्था आहे. पुणे, कोल्हापूर मार्गे होणारी प्रवाशी आणि माल वाहतूक याच मार्गानं होत असल्यानं या रस्त्याचं महत्त्व लक्षात येऊ शकते. पण, सध्या या रस्त्यावर केवळ खड्डेच खड्डे असल्यानं मार्गावरून प्रवास करणारा प्रत्येक जण संताप व्यक्त करत आहे. त्याच मुद्याला मनसेनं हात घातला आहे.















