मुंबई : मुंबईत दोन वर्षापूर्वी झालेल्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर झाला. याअहवालात सुमारे १०० अधिकाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने त्यांना बडतर्फ करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठड्यात ही कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील रस्ते कामात अनियमितता असल्याची तक्रार तत्कालिन महापौर स्नेहल आंबेकर यांनी केली होती. पालिका आयुक्त अजोय मेहता यांना पत्र व्यवहार करुन संबंधितांची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. २३४ रस्त्यांच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी पहिल्या टप्प्यातील ३४ रस्त्यांच्या कामांचा चौकशी अहवाल २०१६ मध्ये सादर झाला. यात पालिकेच्या २ मुख्य अधिकाऱ्यांना निलंबित तर सहा कंत्राटदार कंपन्यांना काळ्या यादीत टाकले. शिवाय, त्यांच्या कामाची देयकही रोखण्यात आली. तर काही कंत्राटदारांवर एफआयआर दाखल केला. मात्र रस्ते कंत्राटातील ३४ रस्त्यांच्या कामात अनियमितता आढळून आल्यानंतरही रस्ते विभागातील अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करण्यासाठी आयुक्त अजोय मेहता यांनी उपायुक्त रमेश बांबळे व चौकशी अधिकारी राजेंद्र रेळेकर यांची समिती नेमली. या समितीने ३४ रस्त्यांच्या कामांबाबत अधिकाऱ्यांवरील चौकशीचा अहवाल आयुक्तांना सादर केला. यांत बहुतांशी अधिकाऱ्यांवर कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवला असून त्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतल्याचे समजते.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्ते घोटाळ्याच्या दुसर्या टप्प्यातील चौकशीत दोनशे रस्त्यांची तपासणी केली होती. त्यातही अनियमितता आढळल्याने यातील १७० अभियंत्यांवर ठपका ठेवण्यात आला. या प्रकरणी आतापर्यंत १०० अभियंत्यांना नोटीसा बजावल्या असून पुढील टप्प्यात आणखी १७० अभियंत्यांना नोटीसा बजावल्या जातील. मात्र, यातील सुमारे शंभर दोषी अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. लवकरच ही कारवाई होणार असून ती पालिकेची एेतिहासिक कारवाई ठरेल.














