रत्नागिरी : गणशोत्सवासाठी हजारो भाविक जिल्ह्यात येत असतात तसेच रोजगारानिमित मुंबईत गेलेल्या चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी येत असतात. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी संबंधित विभागाने लवकरात लवकर जिल्ह्यातील मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजवावे तसेच रस्त्यावरील खड्डयामुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत असून यापुढे खड्ड्यामुळे अपघात झाल्यास कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा सूचना पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेताना पालकमंत्री यांनी सांगितले की कोकणातील महत्वाचा सण गणेशोत्सव आहे. या उत्सवासाठी राज्यातील व देशातील गणेशभक्त उत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यात येतात अशा परिस्थितीत रस्त्यावरील असलेले खड्डे अपघातास कारणीभूत ठरतात हे अपघात रोखण्यासाठी रस्त्याचे निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष संतोष खेराडे, जिल्हाधिकारी प्रदीप पी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.