रत्नागिरी : चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे उमेदवार शेखर गोविंदराव निकम हे उद्या (मंगळवार) सकाळी 10 वाजता आपला उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे.
सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक व रत्नागिरीचे माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या समाधीचे सकाळी 8 वाजता सहकुटुंब दर्शन घेऊन शेखर निकम सावर्डे गावचे ग्रामदैवत श्री केदारनाथाचे आशीर्वाद घेऊन श्री. निकम चिपळूणकडे निघणार आहेत. त्यानंतर चिपळूणचे श्रद्धास्थान भैरीभवानी ग्रामदेवतेचे आशीर्वाद घेऊन संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर सकाळी 10 वाजता चिपळूण न. प. पासून कार्यकर्त्यांची मिरवणूक प्रांतकार्यालयात येईल. त्यानंतर शेखर निकम हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील व यानिमित्त ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी पक्षातील पदाधिकारी तसेच नगरसेवक, जि. प. सदस्य, पं. स. सदस्य, सरपंच, ग्रा.पं. सदस्य, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यासह अनेक नागरिक आणि कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित रहाणार आहेत.