मुंबई : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूचा टेम्पो घेऊन मुंबई,राष्ट्र सेवा दलाचे संघटक महादेव पाटील,पूर्णवेळ कार्यकर्ते दीपक सोनावणे आणि चाऊस शेख आज स्वातंत्र्य दिनाच्या पहाटे मिरज कडे रवाना झाले. पाच लाखाहून अधिक रक्कम व पाच लाखाहून अधिक रकमेच्या वस्तू राष्ट्र सेवा दलाने मुंबईत जमा केल्या आहेत. या साठी मदतीचे आवाहन राष्ट्र सेवा दल,मुंबईने केले होते. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. केशव गोरे ट्रस्ट, गोरेगाव, मालवणी, मालाड, सातरस्ता, कल्याण – डोंबिवली राष्ट्र सेवा दल इथे मदत गोळा करण्यासाठी सेंटर उभी करण्यात आली होती. त्या ठिकाणी कॉलेज विद्यार्थी, महिला आदींनी जीवनावश्यक वस्तू व निधी सेवा दलाकडे सुपूर्द केल्या. राम कोंडाळकर, निसार अली, सुहास कोते यांनी त्या त्या केंद्रावर समन्वयाचे काम केले.
मिरज, इचलकरंजी, गडहिंग्लज, हेरवाड या ठिकाणी राष्ट्र सेवा दलाच्या शाखा सक्रीय आहेत व या ठिकाणचे सेवा दल सैनिक त्या त्या भागात मदत कार्यात मोठया प्रमाणात सामील झाले आहेत. राष्ट्र सेवा दलाच्या केंद्रा मार्फत ही मदत पुरग्रस्त कुटुंबियांना पोहचविली जाणार आहे.नुकतीच अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही मिरज,इचलकरंजी या राष्ट्र सेवा दल केंद्रांना भेट देऊन पुरग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदत कार्याची माहिती घेतली होती.लवकरच ग्राम स्वच्छता व उभारणीच्या कामा साठी सेवा दल सैनिक त्या भागात जाणार आहेत.