मुंबई, (निसार अली) : देशभरामध्ये सन २०१८-१९ हे महात्मा गांधीजींचे १५० वे जयंती वर्ष म्हणून राष्ट्र सेवा साजरे करणार आहे. त्यानुसार ‘आयडिया ऑफ इंडिया’ ही महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारताची कल्पना साकार करण्यासाठी राष्ट्र सेवा दल देशभर विचार जागरण करणार आहे. त्या साठी विविध राज्यात व्याख्याने, चर्चा सत्र, परिसंवाद, शिबिरे, सेवा कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुरेश खैरनार यांनी दिली. मुंबईत नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली.
देशातील सर्व पुरोगामी, जाती-धर्मनिरपेक्ष समतावादी शक्तींच्या एकजुटीतुन रा.स्व.संघमुक्त भारत करण्यासाठी आम्ही लढणार आहोत, असेही खैरनार म्हणाले. डॉ.आंबेडकर,जयप्रकाश नारायण, डॉ.लोहिया, रामास्वामी नायकर ते कबीरा पर्यंत आणि संत तुकारामा पासून सानेगुरुजी पर्यंत थोर महात्म्यांनी सांगितलेल्या ‘खरा तो एकची धर्म’ या विचारांचे जागरण देशभर राष्ट्र सेवा दल करीत आहे. १२५ कोटी लोकांच्या या देशात द्वेषाचा विचार आम्ही रुजू देणार नाही. देश तोडणाऱ्या शक्ती पासून लोकांना सावध करण्यासाठी आमची ही लढाई सुरू आहे, असेही ते म्हणाले.
९ ऑगस्ट १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाला यंदा७५ वर्षे होत आहेत. या निमित्त सेवा दलाचा कुमार वयात हुतात्मा झालेले शिरीष कुमार यांच्या नंदुरबार या शहरातून मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत राष्ट्र सेवा दल रॅली काढणार आहे, अशी माहितीही खैरनार यांनी दिली. सेवा दलाने शेतकरी पंचायत सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. शेती आणि शेतकरी यांच्या विकासाचे धोरण कसे असावे, त्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात लढा उभारण्याचे काम राष्ट्र सेवा दल करणार आहे. शेतकऱ्यांनी १ जून २०१७ पासून पुकारलेल्या संपाला आणि लढ्याला जाहीर पाठिंबा डॉ. खैरनार यांनी जाहीर केला. राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष अल्लाउद्दीन शेख, मुंबईचे कार्याध्यक्ष शरद कदम पत्रकार परिषदेला उपस्थित होते