मुंबई : केंद्रीय संसदीय कार्य तसेच रसायन व खतेमंत्री अनंत कुमार यांच्या निधनाने एक ज्येष्ठ नेता आणि संसदपटू आपण गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, अनंत कुमार यांनी तरुणपणीच भारतीय राजकारणामध्ये प्रवेश करून मोठा लौकिक मिळविला. सहा वेळा संसद सदस्य आणि तीन वेळा केंद्रीय मंत्रीपद भूषविताना त्यांनी माजी प्रधानमंत्री स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी आणि विद्यमान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. राज्यातील विविध रासायनिक संस्था स्थापन करण्यात त्यांचे सहकार्य लाभले होते. तसेच खतांसंदर्भात त्यांनी शेतकरी हित जोपासणारे निर्णयही घेतले. भारतीय राजकारणाच्या क्षितिजावर दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचे नेतृत्व म्हणून त्यांनी लक्षणीय कामगिरी बजावली आहे. भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे गमावणे ही अपरिमित हानी आहे.असेही मुख्यमंत्री म्हणाले.