सन १९८१ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘रारंग ढांग’ ह्या ‘प्रभाकर पेंढारकर’ लिखित कादंबरीच्या आतापर्यंत १७ हून अधिक आवृत्या प्रकाशित झाल्या आहेत. माणूस विरुद्ध निसर्ग, माणूस विरुद्ध माणूस आणि माणूस विरुद्ध तो स्वतः असा हा संघर्ष अखंड चालू राहिला आहे. ह्या संघर्षाचा एक सुंदर पैलू लेखक ह्या कथेच्या माध्यमातून त्यांच्या वाचकांसमोर उलगडतात. हा पैलू समजून घेताना लेखक वाचकांना एका वेगळ्या वाटेवर घेऊन जातात. ही वाट जाते हिमालयाच्या उंच, दुर्गम प्रदेशात. इथे बॉर्डर रोड ऑर्गनाईझशन रस्ते बांधणीचे काम करते. स्वतः लेखक इथे मान्य करतात कि – ”ह्या उंचीवर जगातल्या दुसऱ्या कोणत्याही देशाने क्वचितच रस्ते बांधले असतील”. ही उंची आणि हे काम माणसांनाच काय पण वापरल्या जाणाऱ्या यंत्रांना सुद्धा थकवते. कमी कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडी, लहरी निसर्ग, अकल्पित लँड्सलाइड एवढंच काय तर हिवाळ्यात रस्त्यांवर साठणारे बर्फ ह्या साऱ्या गोष्टींचा मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातून आलेल्या आपल्या सारख्या माणसांवर परिणाम तर होणारच. त्यातील अडचणी दूर करताना होणारी ससेहोलपट विलक्षण अशीच.
हिमालयाच्या ह्या दुर्गम भागात उभ्या कडयांना तेथील स्थानिक लोक ‘ढांग’ असे म्हणतात. ह्या ढांगातून रस्ता खोदून काढणे हा रस्ताबांधणीतील सर्वात कठीण भाग. हीच या कादंबरीची मध्यवर्ती संकल्पना आहे. विश्वनाथ मेहेंदळे हा एक सिविल इंजिनिअर, गोल्ड मेडल मिळालेला. शहरातली नोकरी सोडून बॉर्डर रोड ऑरगॅनिझशन मध्ये दाखल होतो आणि इथूनच कथानक आकार घेत राहतं. जसा पहाडाचा नागमोडी रस्ता गाडी वळ्णावळणाने चढण घेत वेग आणि आवाजाचं संतुलन राखते तशीच ‘रारंग ढांग’ सुद्धा वाचकाच्या मनाची पकड पहिल्या गेअरपासून पकडते हे मागाहून सांगायला न लागणे.
सतलजचा धोंक्रार वाचक अक्षरशः अनुभूती घेतात. ह्या कथाप्रवाहात आपल्याला अनेक स्वभाववैशिटय असलेली माणसे भेटतात. प्रत्येकाची कहाणी वेगळी, आणि तर्हा सुद्धा वेगळी. उदाहरणार्थ –
१) मेजर बंबा – आर्मीची शिस्त प्रमाण मानणारे, अत्यंत हुशार आणि तितकेच तर्हेवाईक. त्याच्या हाताखालच्या लोकांवर त्यांचा जरब आहे. निसर्गाच्या लहरीपणावर स्वतःच्या लहरीपणाने मात करू इच्छिणारे.
२) कॅप्टन नायर – विश्वनाथ ला सुरुवातीच्या दिवसात सोबत करणारे,पण तितकेच गोंधळलेलं व्यक्तिमत्व. मेजर बंबा आणि विश्वनाथ अशी दुहेरी लढत सुरु झाल्यावर हतबल झालेले.
३) कॅप्टन मिनू खंबाटा – हा अवलिया पारशी मनसोक्त जगणारा आणि विश्वनाथला रारंग ढांगात काम करताना तिथल्या जीवनाचे पैलू उलगडणारा.
ह्या कादंबरीची कथा ही चढत्या कमानीची असून त्यातल्या पात्रांच्या तोंडी असलेले खटकेबाज संवाद हे त्याचे प्लस पॉईंट ठरले आहेत. उदाहरण म्हणून – ” ह्या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही, मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटीमेंट्सची ओझी खांद्यावरून वहायची?”. ”दोस्त इथे ८ दिवसांची रजा मिळणे मुश्किल. पण कायमची सुट्टी कधीच मंजूर झालेली असते”.
विश्वनाथ हा हुशार आणि स्वतःच्या विचारांशी प्रामाणिक तरुण त्याच्या कल्पनेप्रमाणे उत्तम काम करणारा आणि सर्वांचं भलं होईल अस करण्याचं हवं असणारा. पण त्याचं हेच स्वातंत्र्य सैन्याच्या शिस्तीत बसत नाही. आपण बांधत असलेल्या रस्त्यावर आपल्याच लोकांची स्मारके बांधायला लागू नयेत ही त्याची माफक अपेक्षा. पण मग पुढे असं काय घडत की ह्या सर्वांची परिणीती कोर्टमार्शल मध्ये होते. ती का होते? विश्वनाथ ला काय गमवावं लागतं? त्याला काय गवसत?
ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी कादंबरी वाचणेच योग्य. रम्य, सुंदर दिसणाऱ्या निसर्गाचं अशाच एका क्षणी दिसणारं संहारक दुसरं रूप वाचकाला अवाक करत. आपल्या नेहमीच्या जगापासून दूर काम करणाऱ्या लोकांची एक वेगळाच अनुभव देणारी ही कथा आहे. कादंबरी संपताना ती आपल्या समोर अनेक प्रश्न ठेवते. त्याची उत्तरे ज्याने त्याने आपापलीच शोधायची आहेत. शेवटी ग्यानचंद ने विचारलेला प्रश्न वाचकाला जीवनाचं अंतिम सत्य आणि वस्तुस्थितीच भान देतो –
”जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता? एक यादगारी….
Publication: मौज प्रकाशन गृह
Pages: 168
Authors: प्रभाकर पेंढारकर
Hard Copy Price: 120