मुंबई : मी स्वतः शेतक-याच्या पोटी जन्म घेतला आहे. शेतक-यांचे दु:ख मला माहिती आहे. शेतक-यांची बाजू घेत सतत ३५ वर्ष मी राजकारणात आहे. त्यामुळे मी शेतक-यांबद्दल कधीही अपशब्द वापरू शकत नाही. माझ्या आणि कार्यकर्त्यांच्या संवादाला शेतक-यांशी जोडू नये. परंतु यावरही शेतक-यांची मनं दुखावली गेली असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे निवेदन भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब पाटील दानवे यांनी आज प्रसारमाध्यमांना दिले. जालना येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दानवे यांनी शेतकर्यांबाबत अपशब्द वापरले होते. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. आज अखेर दानवे यांनी दिलगिरी व्यक्त केली.
एका कार्यकर्त्याकडून तुरीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यावर तुरीच्या संदर्भात सरकारची भूमिका मी त्यांना समजावून सांगितली आणि पुन्हा केंद्र शासनाने एक लाख टन तुर खरेदीसाठी मान्यता दिल्याचे सांगितले. हे कार्यकर्त्याना समजावून सांगितले. अशामध्ये माझा आणि कार्यकर्त्यांचा हा संवाद आहे. यामध्ये मी शेतक-यांना उद्देशून कोणताही अपशब्द वापरला नाही, असे दानवे म्हणाले आहेत.