इंदूर : गेली अनेक वर्षे साधारण कामगिरी करणार्या विदर्भच्या संघाने होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात बलाढ्य दिल्लीचा नऊ विकेट्सनी पराभव करत पहिल्यांदाच रणजी करंडकावर नाव कोरले. दिल्लीने दुसर्या डावात केलेल्या 280 धावांच्या आधारावर विदर्भ संघाला विजयासाठी 29 धावांची आवश्यकता होती. विजयाचे हे आव्हान विदर्भ संघाने एका विकेट्च्या मोबदल्यात 32 धावा करुन पूर्ण केले.
आठव्यांदा रणजी करंडक जिंकण्याच्या इर्याद्याने मैदानत उतरलेल्या दिल्लीने नाणेफेक हरल्यावर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 295 धावा केल्या. त्यात धु्रव शोरेयच्या 145 धावांचा समावेश होता. पहिल्या डावात विदर्भच्या रजनीश गुरबानीने हॅट्ट्रिकसह सहा विकेट्स मिळवल्या होत्या. उत्तरादाखल विदर्भ संघाने अक्शय वाडकरने केलेल्या 133 धावांच्या जोरावर पहिल्या डावात 547 धावा करत 252 धावांची महत्वपूर्ण आघाडी मिळवली होती. सोमवारी सामन्याच्या चौथ्या दिवशी दिल्लीचा दुसरा डाव 280 धावांवर आटोपला. अक्शय वाखरेने चार आणि आदित्य सरवटेने तिन विकेट्स मिळवल्या. रणजी करंडक स्पर्धेतील पहिल्या विजेतेपदासाठी विदर्भ संघाला 29 धावांची आवश्यकता होती. दुसर्या डावातील पाच षटकांमध्ये एक विकेट गमावून विदर्भ संघाने 32 धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केले. संजय रामास्वामीने नाबाद 9 आणि वासिम जाफरने नाबाद 17 धावा केल्या.
पहिल्यांदाच अंतिम सामन्यात
रणजी करंडक स्पर्धेतील विदर्भ संघाचा हा विजय ऐतिहासीक ठरणार आहे. विशेष म्हणजे रणजी करंडक स्पर्धेच्या इतिहासात विदर्भ संघाने पहिल्यांदाच रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. याआधी विदर्भ संघाने दोन वेळा उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. साल 2002-03 आणि 2011-12 मधील हंगामात विदर्भ संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले होते, पण हा टप्पा त्यांना पार करता आला नव्हता. याशिवाय विदर्भचा संघ दोन वेळा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळला होता. पहिल्यांदा त्यांनी 1970-71 मध्ये आणि त्यानंतर 1995-96 मध्ये दुसर्यांदा उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले होते.
गुरुबानी ठरला मॅन ऑफ द मॅच
अंतिम सामन्यात हॅट्ट्रिक मिळवणार्या रजनीश गुरबानीला सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला. या सामन्यात त्याने एकुण आठ विकेट्स मिळवल्या. रणजी करंडक स्पर्धेतील अंतिम सामन्याच्या इतिहासात गुरुबानीच्याआधी 1972-73 च्या हंगामातील मुंबई विरुद्धच्या अंतिम सामन्यात तामिळनाडूच्या के.बी.कल्याण सुंदरमने हॅटट्रिक मिळवली होती. सुंदरमच्या शानदार कामगिरीनंतरही तामिळनाडुचा 123 धावांनी पराभव झाला होता. यंदाच्या रणजी स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात गुरुबानीच्या कामगिरीमुळे विदर्भ संघाने कर्नाटकला हरवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. या सामन्यात एकुण 12 विकेट्स मिळवताना गुरुबानीने दुसर्या डावात सात विकेट्स मिळवल्या होत्या. यंदाच्या रणजी हंगामात स्पर्धेत दोन हॅट्ट्रिक नोंदल्या गेल्या. कर्नाटकचा वेगवान गोलंदाज विनयकुमारने उपांत्यपूर्व सामन्यात मुंबईविरुद्ध हॅट्ट्रिक मिळवली होती.