पुणे : रांजणगाव एमआयडीसीतील फियाट कंपनीचा जीप कंपास प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे “मेक इन इंडिया”चे स्वप्न पूर्ण करणारा आहे. ही कंपनी सामाजिक दायित्वातही अग्रेसर असून या कंपनीच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या महिलांसाठीच्या स्कील डेव्हलपमेंट प्रकल्पाला शासन सर्वतोपरी मदत करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
रांजणगाव ता. शिरुर येथील एमआयडीसीतील फियाट कंपनीच्या जीप कंपास प्रकल्पात तयार झालेल्या अत्याधुनिक जीप वाहनाच्या अनावरण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार दिलीप गांधी, आमदार बाबुराव पाचर्णे, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,जिल्हाधिकारी सौरभ राव, फियाट कंपनीचे भारतातील मुख्य कार्यकारी अधिकारी गुरूप्रताप बोपारा, कंपनीचे पोलीन कॉला, केवीन फ्लिन तसेच कंपनीचे अधिकारी, कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, फियाट कंपनीच्या माध्यमातून जागतिक दर्जाचे उत्पादन रांजणगाव एमआयडीसीत तयार होत आहे. देशातील उद्योगांना चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाची संकल्पना मांडली. पंतप्रधानांच्या या स्वप्नाला चालना देणारा प्रकल्प फियाट इंडियाच्या माध्यमातून आज साकारला आहे. या प्रकल्पात तयार होणाऱ्या गाडीचे ८० टक्के भाग हे महाराष्ट्रात तयार होत आहेत. देशात पहिल्यांदा प्लाझमा तंत्रज्ञानासारखे तंत्रज्ञान या प्रकल्पात वापरण्यात आले आहे. अत्यंत आधुनिक असा हा प्रकल्प अत्यंत कमी वेळेत सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने देशाच्या ऑटोमोबाईल क्षेत्राला गती मिळाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी सफाईदारपणे गाडी चालवली…
प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या जीप कंपास गाडीचे औपचारीक अनावरण झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जीप कंपास गाडीची राईड घेतली. सुरुवातीला अत्यंत हळूवार गाडी चालवत मुख्यमंत्र्यांनी गाडी कंपनीच्या आवारात घेतली. कंपनीच्या आवारातील रस्त्यावर सफाईदारपणे गाडी चालविण्याचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी त्यांच्या शेजारी गुरूप्रताप बोपारा बसले होते. तर मागील सीटवर खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, आमदार बाबुराव पाचर्णे हे मुख्यमंत्र्यांसोबत होते.