मुंबई : राणीच्या बागेतील कृष्णधवल पेंग्विन्स पाहण्यासाठी सलग दुसऱ्या दिवशी रविवारीही हजारो पर्यटकांची झुंबड उडाली होती. पहिल्या दिवशी सुमारे १२ हजार जणांनी पेंग्विन्स पाहिले. तर रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने ते पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली.
पेंग्विन कक्षाचे लोकार्पण शुक्रवारी १७ मार्चला झाले. शनिवारपासून पेंग्विन्स पाहण्यासाठी तो कक्ष खुला झाला. पेंग्विन्स दर्शन ३१ मार्चपर्यंत मोफत आहे. शनिवारी पहिल्याच दिवशी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रविवारी तर गर्दी आवरणे कर्मचाऱ्यांना कठीण गेले. पेंग्विन्स कक्षाजवळ प्रचंड गर्दी होत असल्याने पर्यटकांना गटागटाने सोडण्यात आले. पर्यटकांच्या संख्येत भर पडत गेल्याने सुरक्षा रक्षक व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली.
पेंग्विन्सना आकर्षक नावे देण्यात आल्याने पर्यटकही त्यांना त्याच नावाने हाका मारत होते. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत पेंग्विन्स पाहता येणार आहेत.