रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): नारायण राणे यांच्या कुंडलीमध्ये सध्या मंत्रिपदाचा योग नसल्याचा टोला हाणत रत्नागिरी-सिंधुदुर्गचे शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे यांनी खिल्ली उडवली आहे. रत्नागिरीत पत्रकार पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांच्या मंत्रीपदावरून राजकीय वर्तुळात सध्या खिल्ली उडवली जात आहे. शिवसेना तर संधी मिळेल तेव्हा या विषयावरून राणेंवर टीका करत असते. त्यातच सध्या प्रस्तावित नाणार रिफायनरीबाबत भाजप अनुकूल असताना राणे या रिफायनरीच्या विरोधात आहेत. याबाबत खासदार विनायक राऊत यांना विचारलं असता, राणे या रिफायनरीला विरोध करून मुख्यमंत्र्यांवर मंत्रीपदासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांना मंत्रीपद मिळणार नाही. रिफायनरी प्रकल्पाची ढाल करून मंत्रिपद पदरात पाडण्याचा राणे यांचा प्रयत्न आहे. पण नारायण राणे हे मंत्री होणारच नाहीत, त्यांच्या कुंडलीत मंत्रिपदाचा योग नाही, त्यांची कुंडली काय आहे हे जनतेला माहीत आहे, असं म्हणत खासदार विनायक राऊत यांनी राणेंची खिल्ली उडवली.