रत्नागिरी, प्रतिनिधी: नारायण राणे यांच्या समर्थनार्थ त्यांच्या समर्थकांनी पदांचे राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. शुक्रवारी चिपळूण, राजापूर आणि लांजामधील काँग्रेसच्या काही पदाधिकाऱयांनी राजीनामे दिले होते. आज रत्नागिरी तालुक्यातल्या पदाधिकाऱयांनी सामूहिक राजीनामे देत राणेंना पाठिंबा दर्शवला आहे.
घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेस नेते नारायण राणे यांनी काँग्रेस सोडल्याची घोषणा केली. आता दसऱ्याच्या मुहूर्तावर ते पुढील घोषणा करणार आहेत. आख्या महाराष्ट्राचं त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागलं आहे. पण सध्या काँग्रेसमधल्या राणेंच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातही काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्यानी गेल्या दोन दिवसांत राजीनामे दिले आहेत. त्यामध्ये चिपळूण, राजापूर, आणि लांजा या तालुक्यातील पदाधिकारयांचा समावेश होता. त्यानंतर आज रत्नागिरी तालुक्यातील राणे समर्थकांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे दिले. पत्रकार परिषद घेऊन या पदाधिकार्यानी तशी घोषणा केली. आता आमचा पक्ष हा राणे साहेबच असून ते जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहू, असे या कार्यकर्त्यांनी यावेळी स्पष्ट केले.