मुंबई : चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी कलाकारांना परदेशात जाण्याची आवश्यकता भासू नये म्हणून राज्यात रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर दादासाहेब फाळके चित्रनगरी सुसज्ज व अत्याधुनिक पध्दतीने विकसित करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी येथे सांगितले.
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक संस्थांसाठी दादासाहेब फाळके चित्रनगरी, गोरेगाव यांनी पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तावडे यांनी उपस्थित संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
चित्रनगरीमुळे पर्यटनाला देखील चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील होतकरु तरुणांमधून भावी पिढीतील दिग्दर्शक, गायक, गीतकार घडविण्यासाठी महाराष्ट्र स्कुल ऑफ ड्रामाची सुद्धा निर्मिती करण्यात आली असल्याचेही श्री. तावडे यांनी सांगितले. शासनाकडून आपल्या सारख्या सेवाभावी संस्थांच्या काय अपेक्षा आहेत?, याबाबत चर्चा केली. त्याचप्रमाणे दादासाहेब फाळके चित्रनगरी या चित्रनगरीची ओळख सेवाभावी संस्थांना व्हावी आणि या विभागाचे उपक्रम आपल्यापर्यंत पोहचावेत या उद्देशाने अशा प्रकारचा कार्यक्रम अयोजित करण्यात आल्याचेही, तावडे यांनी सांगितले.
सांमाजिक,सांस्कृतिक, कला आदी बांधिलकीतून ज्या समाजसेवी संस्था तळागाळातील उपेक्षित लोकांसाठी कार्य करत आहेत. अशा संस्थांना महामंडळाच्या माध्यमातून सहाय्य करण्यात आहे. अशा संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी तसेच भावी काळात भरीव कार्य करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमासाठी एकूण ६४ समाजसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रम आयोजनामागची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
कार्यक्रमा दरम्यान संस्थांच्या शंका/प्रश्नांचे निरसन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे तसेच धर्मादाय उपायुक्त भरत व्यास, सहाय्यक धर्मादाय आयुक्त राजू पेरे यांनी केले. कार्यक्रमा दरम्यान उपस्थित प्रतिनिधींनी कार्यक्रमांची संकल्पना व कार्यक्रमाच्या आयोजनामुळे संस्थांना मिळालेले मार्गदर्शन हे खूप मोलाचे असल्याने आगामी काळात अशा नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या.
यावेळी दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालिका जयश्री भोज, सहव्यवस्थापकीय संचालक निवृत्ती मराळे, धर्मदाय उपायुक्त भरत व्यास तसेच चित्रपट क्षेत्रातील संबधित व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.