नवी दिल्ली : देशाच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने आज बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर करण्यात आले. कोविंद या नावाबाबत एनडीएच्या घटकपक्षांना कळविण्यात आल्याचे शहा म्हणाले.२३ जूनला ते उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
रामनाथ कोविंद हे दलित आहेत. १९९४ ते २००६ अशी १२ वर्ष ते राज्यसभेचे सदस्य होते. १९९८ ते २००२ या काळात ते भाजपा दलित मोर्चाचे अध्यक्षदेखील होते. कोविंद हे मूळचे उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यांनी कानपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
कोविंद यांचे नाव ठरण्याआधी सर्व राजकीय पक्षांशी चर्चा करण्यात आली. नाव ठरल्यानंतरच एनडीएतील घटकपक्षांना कळविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनाही कोविंद यांच्या नावाबाबत सांगितले, असे अमित शहा म्हणाले.