रत्नागिरी, (आरकेजी) : तूर खरेदी संदर्भात सरकारचे धोरण चुकले, असे म्हणत शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच तूर खरेदीसंदर्भातला शेतकर्यांना जो दिलासा मिळाला आहे, तो मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या प्रयत्नामुळेच मिळाला, असा दावाही त्यांनी केला. रत्नागिरी पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटनासाठी ते रत्नागिरीत आले होते, त्यावेळी त्यांनी नारायण राणेंसह मनसेवरही टीका केली.
नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताबाबत कदम म्हणाले की, राणे यांना माझ्या शुभेच्छा आहेत, भाजपनंतर ते आणखी कोणत्या पक्षात जातील तेही त्यांनी जाहीर करावे, असा टोलाही कदम यांनी लगावला.
मांसाहार करणार्यांना मुंबईत घर नाकारले जात आहे, त्याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. याबाबत कदम म्हणाले की, मनसेने जी भूमिका घेतली आहे ती मुळात शिवसेनेचीच भूमिका आहे. मनसेचे अस्तित्व संपत चालली आहे. त्यांची अवस्था मृत पालीच्या वळवळणाऱ्या शेपटीप्रमाणे झाली आहे, अशी खिल्ली कदम यांनी उडविली.