नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात लक्षणीय आणि सर्वांगीण विकासाचे कार्य केले आहे,असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. देशात २ कोटी ६८ लक्ष दिव्यांगजन असून त्यांचे जीवन अधिक सुसह्य आणि आत्मनिर्भर होण्यासाठी केंद्र सरकारने ‘सुगम्य भारत’ अभियान सुरू केले असून सुमारे ६ लक्ष दिव्यांगजनांना आवश्यक साधने,उपकरणे आपल्या मंत्रालयातर्फे पुरवण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. दिव्यांगजनांकडे असलेली अनेक कौशल्ये लक्षात घेउन, त्याला अनुरूप अशी साधनसामग्री पुरवण्यावर आपल्या सरकारचा भर असल्याचे, ते म्हणाले.
तरूणांना रोजगार देण्यासाठी येत्या दोन वर्षांत कसोशीने प्रयत्न केले जातील, यावर त्यांनी यावेळी भर दिला. ‘जनधन’ बँक अकाउंटच्या माध्यमातून वंचितांना बँक प्रणालीशी जोडून त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवणे, ‘मुद्रा’ योजने अंतर्गत देशातील लक्षावधी लोकांना रोजगारासाठी कर्ज देणे, ‘स्टार्ट-अप’ योजने अंतर्गत नवउद्यमांसाठी दलितांसह अनेकांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे, यासारख्या केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
केंद्र सरकारचे ‘स्वच्छ भारत अभियान’ हे केवळ परिसर-पर्यावरण स्वच्छतेपुरते मर्यादित नसून, देशाची अर्थ-व्यवस्थाही स्वच्छ करण्यासाठी, या सरकारने अनेक पावले उचलली असून विमुद्रीकरणाचा निर्णय हे या दृष्टीने ‘क्रांतिकारी’ पाउल होते, असेही मत त्यांनी यावेळी मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत नागपूरातील दीक्षाभूमीसह पाच स्थानांचा ‘पंचतीर्थ’ या संकल्पनेसह विकास करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचाही संदर्भ त्यांनी यावेळी दिला.
रोख-विरहित व्यवहाराला प्रोत्साहन देण्यासाठी ‘भीम-अॅप’ विकसीत करणे, हे अॅप नंतर आधारप्रणालीशी जोडणे या मागे देशातील व्यवहार स्वच्छ आणि पारदर्शक व्हावेत, असा पंतप्रधानांचा विचार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
नव्या वस्तू आणि कर प्रणाली – ‘जीएसटी’ मुळे एकीकडे जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करत असतानाच अन्य माध्यमातून सरकारचा महसूल वाढेल, याकडे लक्ष देण्यात आले आहे, असेही ते म्हणाले.
नागपूरचे खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांचा केंद्रीय मंत्रिमंडळातील अत्यंत कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी यावेळी उल्लेख केला आणि गडकरी यांच्या षष्ठयब्दिपूर्ती निमित्त त्यांनी शुभेच्छा दिल्या.