रत्नागिरी ( विशेष प्रतिनिधी): खेड मधील जिजामाता उद्यानातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणाचा तपास लावण्यास स्थानिक पोलीस प्रशासनाला अपयश येत असून, हा तपास सीआयडीकडे सोपावावा तसेच ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत, अशा सर्व ठिकाणी सीसीटिव्ही बसवावेत, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे करणार असल्याचे केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परीषदेत सांगितले. आठवले सोमवारी खेड दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबन प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक,अप्पर जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, जिल्हासमाजकल्याण अधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत.
डॉ. आंबेडकर पुतळ्याची विटंबना हा सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी रचलेला कट आहे. अशा प्रकारची खेडच्या इतिहासातील कलंक लावणारी व निंदनीय बाब आहे. ज्या कोणी समाजकंटकांनी पुतळ्याची विटंबना केली त्याचा शोध घ्यावा. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या अस्पष्ट चेहऱ्यामुळे मुळ गुन्हेगारापर्यंत पोहचण्यास पोलीसांना यश आले नाही, ही बाब योग्य नाही. पोलीस खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याचे काम कसब आणि कौशल्य वापरून करतात. त्याच पद्धतीने पोलीसांनी या प्रकरणाचा छडा लावावा, असे स्पष्ट निर्देश आठवले यांनी दिले. दरम्यान, या प्रकरणाचा तपास जलद गतीने होण्यासाठी हे प्रकरणी सीआयडीकडे सोपवावे अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असून ज्या ज्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे आहेत त्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत यासाठी आपण जिल्हा नियोजनमधून निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आठवले यांनी दिले.














