रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या अटल प्रतिभा पोषण केंद्रातर्फे ‘संवाद २०२५’ हा नवा उपक्रम
मुंबई: १६ एप्रिल: ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी’ असे मराठीत पूर्वापार म्हटले जाते. महाराष्ट्र उद्योगधंद्यांत अग्रेसर असला, तरी अजूनही राज्यातील बहुतांश लोकं स्वतः व्यवसाय करण्यापासून दूरच राहातात. देशात आता स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देऊन उद्योगांतून रोजगार निर्मितीला प्रेरणा दिली जात आहे. याच हेतूने २०१९ पासून कार्यरत असलेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या (आरएमपी) अटल इंक्युबेशन सेंटरतर्फे (एआयसी – प्रतिभा पोषण केंद्र) ‘संवाद २०२५ – युवा उद्योजकता: स्वप्ने व संधी’ हा नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे. उद्योजकता आणि नवनिर्मितीला प्रेरणा देणाऱ्या या उपक्रमातील पहिली १-दिवसीय कार्यशाळा अलीकडेच प्रबोधिनीच्या उत्तन येथील निसर्गरम्य केंद्रात पार पडली.
भाईंदर परिसरातील इच्छुक ग्रामस्थांची हजेरी
होतकरू स्थानिक ग्रामस्थांमध्ये उद्योजकता रुजावी व त्यांची स्वप्ने साकार व्हावी म्हणून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी उत्तन, डोंगरी, राई, मोर्वा व जवळच्या अन्य गावांतील ६० पेक्षा जास्त तरुण व मध्यमवयीन पुरुष व महिला इच्छुक उद्योजक हजर होते. यांतील काही जण नोकरी, शेती किंवा मासेमारी करतात, तर काही जण घरगुती शिवणकाम किंवा आहारसेवा पुरवितात. बहुतांश जण दहावी किंवा बारावीपर्यंत शिकलेले आहेत, पण त्यांच्याकडे विविध कल्पना आहेत. उपस्थितांमध्ये सुमारे १० विद्यार्थी सुद्धा होते.
स्टार्ट-अप्स, भांडवल व योजनांबद्दल मार्गदर्शन कार्यशाळेत श्री. उदय वांकावाला, प्रमुख कार्यकारी अधिकारी, एआयसी-आरएमपी, यांनी उपस्थितांना संस्थेतर्फे नवउद्योजकांना देण्यात येणाऱ्या मार्गदर्शनाची माहिती दिली. ते म्हणाले, “कल्पनेचे परिवर्तन स्टार्ट-अपमध्ये कसे करायचे याचे आम्ही मार्गदर्शन देतो. आत्तापर्यंत असंख्य ग्रामीण होतकरू उद्योजकांना आम्ही अशाप्रकारे मदत केली आहे.” श्री. धम्मपाल थोरात, जिल्हा प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र सेंटर फॉर एन्ट्राप्रेन्युअरशिप डेव्हलपमेंट, यांनी उपलब्ध असलेल्या शासकीय योजना, पुरुष व महिलांसाठी असलेले अनुदान, तसेच दिले जाणारे प्रशिक्षण या मुद्द्यांवर संवाद साधला. तद्नंतर श्री. सचिन रानवसे, उपमहाव्यवस्थापक, जनकल्याण सहकारी बँक, यांनी सहभागींना भांडवल उभारणी, बँकेकडून कर्जाची उपलब्धता, तसेच त्यासाठी लागणारी कागदपत्रे व असलेले निकष यांवर मार्गदर्शन केले आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री. प्रविण पाटील, समाजसेवक, राई, यांचे विशेष सहकार्य व प्रयत्न होते.
म्हाळगी प्रबोधिनीचा हा नवीन उपक्रम या उद्योजकांना उपलब्ध संधीची माहिती देणे आणि व्यवसायासंबंधी ज्ञानाने सज्ज करण्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरला. भविष्यातही अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत.