मुंबई, (निसार अली) : भाजप आमदार राम कदम यांनी केलेल्या बेताल वक्तव्याचा विरोध कमी होताना दिसत नाही आहे. ट्विटरद्वारे राम कदम यांनी माफी मागितली असली तरी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, अशी मागणी अनेक पक्ष संघटना करत आहेत. गुरुवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी मालवणीतील अस्मिता महिला संघ या संघटनेने आमदार राम कदम यांच्यावर येणाऱ्या 72 तासांत कायदेशीर गुन्हा नोंदवून कारवाई करा;अन्यथा 72 तासानंतर आम्ही आमदार राम कदम यांना घराबाहेर फिरू देणार नाही, असा इशारा मालवणी पोलिसांना पत्र लिहून दिला आहे. या वेळी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक फटांगरे यांनी या योग्य ते सहकार्य करू, असे आश्वासन या महिलांना दिले. अस्मिता महिला संघाच्या वतीने स्नेहा पवार, वैशाली महाडिक, अमिका कोळी, श्रुती पवार, सुमन कडलक, सविता अधिकारी, नम्रता प्रधान आदी उपस्थित होत्या.