मुंबई, प्रतिनिधी:- मुंबई श राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी शिवसेनेने हटके महा रक्तदान शिबीर आयोजित केला आहे. रक्तदान करणाऱ्या व्यक्ती मांसाहारी असेल तर १ किलो चिकन आणि शाकाहारीना १ किलो पनीर देण्यात येणार आहे. माहीम वरळी विधानसभा क्षेत्राच्यावतीने रविवारी दि. १३ डिसेंबर रोजी न्यू प्रभादेवी रोड येथील राजाभाऊ साळवी उद्यानात हे शिबीर भरविले आहे.
कोरोना अजूनही नियंत्रणात येत नाही. त्यामुळे रक्ताची उणीव भासू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत, शिवसेनेचे नगरसेवक समाधान सरवणकर यांनी अनोख्या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. केईएम रुग्णालयाच्या सहकार्याने हे शिबीर होणार आहे. सुमारे १ हजार रक्तदाते यात सहभागी होतील. कोरोनाच्या काळात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यास या शिबीरामुळे थोडीफार मदत होईल. खेळीमेळीच्या वातावरणात हे शिबीर करण्याचा मानस असून रक्तदात्यांना १ किलो चिकन आणि १ किलो पनीर दिला जाईल. वेगळ्या पध्दतीने शिबीर आयोजित करण्यासाठीच चिकन आणि पनीर देण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे नगरसेवक सरवणकर यांनी सांगितले.