मुंबई : जीडीसी अँड ए म्हणजेच सहकार व लेखा शासकीय पदविका 2020 व सी. एच. एम 2020 या परीक्षा रखंडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे तसेच सहकार चळवळीचे नुकसान होत आहे, या परीक्षा तातडीने ऑनलाइन पध्दतीने घेण्यात याव्यात, अशी मागणी सफल विकास वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष निसार अली यांनी राज्य सरकारकडे केली आहे. याबाबतचा ईमेल त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला केला आहे.
जीडीसी अँड ए व सिएचएम या परीक्षा दरवर्षी महाराष्ट्र शासनांतर्गत घेण्यात येतात. महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी त्यासाठी मोठ्या संख्येने अर्ज करतात. या परीक्षा सन 2020 मध्ये मे महिन्यात होणार होत्या. कोविड महामारीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा स्थगित करण्यात आल्या. परंतु आता एक वर्षाचा कालावधी उलटला तसेच सर्वच शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ यांनी परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे जीडीसी अँड ए आणि सिएचएम 2020च्या परीक्षाही लवकरात लवकर ऑनलाईन पध्दतीने घेण्यात याव्यात. परीक्षा अर्ज भरतेवेळी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरलेले असून परीक्षा घेणेबाबत शासन उदासीन दिसत आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे, असे निसार अली म्हणाले.
या परीक्षा लवकरात लवकर ऑनलाइन घेण्यात येऊन परीक्षेचा निकाल एक महिन्याच्या आत जाहीर करावा, अशी मागणी शासनाकडे केल्याचे ते म्हणाले.















