मुंबई, ता. 28 : राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांना मदत करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार राहुल शेवाळे यांनी खासदरकीचे एक महिन्याचे वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’मध्ये जमा केले आहे. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन खासदार शेवाळे यांनी हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. गेल्या महिन्यातही, ‘कोरोना लसीकरण मोहिमे’साठी खासदार शेवाळे यांनी आपले वेतन ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ मध्ये जमा केले होते.
मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे,कोल्हापूर, सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला जन्मदिन साजरा न करण्याचा निर्णय घेत, सर्वांना मदतीचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत खासदार शेवाळे यांनी आपले वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा केले. अशाच रीतीने केरळमधील महापूर, कोल्हापूरमधील प्रलय यावेळीही खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेऊन आपले वेतन देऊ केले होते.