मुंबई, ता. 14 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्याची समस्या सोडविण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. ‘डिपार्टमेंट ऑफ अटॉमिक एनर्जींचे सेक्रेटरी आणि भाभा अटॉमिक रिसर्च सेंटरचे चेअरमन श्री. के एन व्यास यांच्यासोबत यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली असून या आस्थापनांमधील शास्त्रज्ञ, ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी राज्य सरकारला तांत्रिक सहाय्य करण्यास तयार असल्याची माहिती खासदार शेवाळे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या गंभीर रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज भासते. मात्र, राज्यात याक्षणी ऑक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्या अनुषंगाने, भाभा अटॉमीक रिसर्च सेंटरच्या अधिकारी आणि शास्त्रज्ञाची भेट घेऊन यासंदर्भात नेमका कसा तोडगा काढता येईल, यावर खासदार राहुल शेवाळे यांनी चर्चा केली. हे अधिकारी राज्य शासनाला यासंदर्भात सल्ला आणि तांत्रिक मदत करण्यास अनुकूल असून याबाबत राज्य सरकार आणि भाभा अटॉमीक एनर्जीच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच आयोजित केली जाऊन ऍक्शन प्लॅन तयार केला जाणार आहे.