रत्नागिरी,महाराष्ट्रात येत्या 6 महिन्यांत विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लागतील, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. ते मंगळवारी रत्नागिरीत बोलत होते.
यावेळी विनायक राऊत म्हणाले की, सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या केसला किती जरी विलंब लागला, तरी कायदे तज्ज्ञांच्या मते जानेवारी- फेब्रुवारीपर्यंत त्या केसचा निकाल लावावाच लागेल. निकाल काय लागेल हे स्पष्ट आहे. ते झाल्यानंतर कदाचित राष्ट्रपती राजवट लावतील आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्याव्या लागतील असं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.
तसेच खोट्या नाट्या केसेस टाकून महाविकास आघाडीच्या नेत्यांना त्रास दिला जात आहे. रडीचा डाव खेळणारे हे सरकार आहे, अशी टीका विनायक राऊत यांनी यावेळी केली. दरम्यान आमची सर्वोच्च न्यायालयात लढण्याची तयारी भक्कम आहे, कितीही विलंब लागला तरी न्याय आमच्या बाजूनेच होईल असंही राऊत यावेळी म्हणाले.