मुंबई : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेसाठी आज झालेल्या निवडणुकीत विक्रमी ५५ टक्के मतदान झाले. मुंबईसह राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मंगळवारी सरासरी ५६.३०; तर ११ जिल्हा परिषदा व ११८ पंचायत समित्यांसाठी सरासरी ६९.४३ टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी वर्तविला आहे.
राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार मंगळवारी राज्यात सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान झाले. गडचिरोली जिल्ह्यातील ४ पंचायत समित्या आणि त्याअंतर्गतच्या निवडणूक विभागात मात्र सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मतदानाची वेळ होती. यवतमाळ जिल्हा परिषदेचे ५ निवडणूक विभाग व पंचायत समितीच्या १२ निर्वाचक गणांत ७३ टक्के; तर वर्धा जिल्हा परिषदेच्या २ निवडणूक विभागात व पंचायत समितीच्या २ निर्वाचक गणांत ६८.९९ टक्के मतदान झाले. काही किरकोळ अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सर्वत्र शांततेत पार पडली. महानगरपालिकेच्या मागील निवडणुकांत सरासरी ५२ टक्के; तर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत सरासरी ६८.९९ टक्के मतदान झाले होते.
प्राथमिक अंदाजानुसार महानगरपालिकानिहाय मतदानाची टक्केवारी-
बृहन्मुंबई- ५५, ठाणे- ५८, उल्हासनगर- ४५, पुणे-५४, पिंपरी-चिंचवड- ६७, सोलापूर- ६०, नाशिक- ६०,अकोला- ५६, अमरावती- ५५ आणि नागपूर- ५३. एकूण सरासरी- ५६.३०.
प्राथमिक अंदाजानुसार जिल्हा परिषदनिहाय (पंचायत समित्यांसह) मतदानाची टक्केवारी-
रायगड- ७१, रत्नागिरी- ६४, सिंधुदुर्ग- ७०, नाशिक- ६८, पुणे-७०, सातारा- ७०, सांगली- ६५, सोलापूर-६८,कोल्हापूर- ७०, अमरावती- ६७ आणि गडचिरोली- ६८. सरासरी- ६९.४३.