रत्नागिरी : चिपळूण येथे राज्यस्तरीय पत्रकार संमेलनासाठी राज्यातील वेगवेगळया जिल्हयातून पत्रकार बंधू आलेले आहेत. त्यांनी चिपळूण येथे आयोजित पर्यटन सफरीमध्ये येथील पर्यटन, निसर्ग सौदंर्याचा आस्वादही घेतला आहे. हे पत्रकार कोकणातील निसर्ग सौंदर्याबाबत, समृध्दीबबत, पर्यटनस्थळांबाबत माहिती आपल्या भागातील वृत्तपत्रांमध्ये लिखाणाद्वारे प्रसिध्द करतील आणि येथील पर्यटन वाढीस चालना मिळेल असा विश्वास राज्याचे गुहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी व्यक्त केला.
चिपळूण येथे ऑल जर्नालिस्ट अण्ड फ्रेन्डस् सर्कल आयोजित राज्यस्तरीय पत्रकार संमेलन 2018 मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमादरम्याने पालकमंत्री रविंद्र वायकर बोलत होते. यावेळी पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते स्वर्गीय नानासाहेब जोशी पत्रकार नगरीचे उद्घाटन झाले. यावेळी समेलनाध्यक्ष मल्हार अराणकल्ले, खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, आमदार प्रसाद लाड, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरखा खेराडे, यासिन पटेल, विकास जोशी, सतीश कदम, मकरंद भागवत, राजेंद्रकुमार शिंदे, दै. सागर च्या संपादिक शुभदा जोशी, प्रशांत पटवर्धन, प्रकाश देशपांडे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री रविंद्र वायकर म्हणाले जिल्हयाला समृध्द असा समुद्र किनारापट्टी लाभलेली आहे, गड किल्ले, वेगवेगळी पर्यटन स्थळे जिल्हयात आहेत. जिल्हयात पर्यटनातही वाढ झालेली आहे. पंरतु मोठया प्रमाणात वाढ होण्यासाठी कनेक्टीव्हीटी वाढणे गरजेच आहे. जिल्हयात आता लवकरच विमानसेवा सुरु होत आहे, महामार्ग चौपदरीकरणाचे कामही सुरु आहे, यामुळे कनेक्टीव्हीटीत वाढ होऊन पर्यटनामध्ये वाढ होईल, असा विश्वास त्यानी व्यक्त् केला. जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात गड-किल्ले आहेत, पर्यटन वाढीच्या दृष्टिने त्यांचे सवंर्धन करणे गरजेच आहे. पर्यटन वाढल्याने येथील जनतेला रोजगारही उपलब्ध होणार असून यासाठीही आपण प्रयत्नशील आहोत, असेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले पत्रकारांच्या समस्या अडचणी आपण जाणत आहोत आणि त्या सोडविण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करु. कोकणाचा विकास करणे हा एकच ध्येय समोर ठेवणे गरजेच आहे. कोकणाचा विकास करण्यासाठी आपण कटिबध्द असून त्यासाठी लागेल ते सहकार्य करण्यास आपण तयार आहोत.
यावेळी संमेलन अध्यक्ष मल्हार अराणकल्ले म्हणाले आता पत्रकारिता व्यापक होत असून त्याचा परिणामही व्यापक आहे. पत्रकारितेमध्ये आता नवनवीन तंत्रज्ञान येत असून ते आत्मसाद करणे गरजेच आहे.
खासदार विनायक राऊत, आमदार सदानंद चव्हाण, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरखा खेराडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी दुर्मिळ वृत्तपत्रे व मासिके यांचे प्रदर्शनही लावण्यात आले होते. दै. सागर, दै.रत्नागिरी टाईम्स, दै. रत्नभुमी या वृत्तपत्र कुटुंबाचा सत्कार यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच राज्यस्तरीय पत्रकार संमेलनाचे औचित्य साधून भरविण्यात आलेल्या निंबध स्पर्धा, छायचित्र स्पर्धेमधील विजेतांना यावेळी गौरविण्यात आले.
यावेळी राज्यस्तरीय पत्रकार संमेलानासाठी राज्यातून मोठया प्रमाणात पत्रकार उपस्थित होते.