मुंबई : राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो यांना तर राजकपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिध्द अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे. चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारासाठी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, तसेच व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कारासाठी प्रसिध्द अभिनेते अरुण नलावडे यांची निवड झाली आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणा-या पुरस्कारांची घोषणा केली.
मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले, तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली अशा ज्येष्ठ व्यक्तीला चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव व चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार आणि राजकपूर जीवनगौरव व राजकपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप ५ लाख रुपये व स्मृतिचिन्ह तर विशेष योगदान पुरस्काराचे स्वरुप ३ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने या पुरस्कारार्थींची निवड केली.
विक्रम गोखले
चेहऱ्यावरील हावभाव, डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या भावना आणि तितकीच प्रभावी संवादफेक यामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारे कलाकार म्हणजे विक्रम गोखले. सशक्त, गंभीर भूमिका साकारणारे संवेदनशील कलावंत म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला आहे. विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला. त्यांच्या रक्तातच अभिनय भिनलेला आहे. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि सिनेमातील एक गाजलेले नाव. गेली शंभर वर्षे जुनी परंपरा असणाऱ्या गोखले कुटुंबियांचे विक्रम गोखले हे महत्वाचे शिलेदार आहेत. मात्र स्वकर्तृत्वावर ठाम विश्वास असणाऱ्या विक्रम गोखले यांनी स्वत:च्या अभिनय क्षमतेच्या जोरावर अभिनय क्षेत्रात नवी उंची गाठली आहे. मराठी, हिंदीसोबतच त्यांनी गुजराती भाषेतही काम करत आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले आहे. अभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्ष अविरत सेवा करत त्यांनी सामाजिक बांधिलकीचा वसा जपला आहे. मिशन-११, समर २००७, हे राम, मुक्ता,हम दिल दे चुके सनम, बलवान, अग्निपथ, परवाना यासह ९० चित्रपटांच्या वर हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या आहेत.
अरुण नलावडे
अरुण नलावडे हे मराठी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन मालिका या तीनही माध्यमातून अतिशय सकसपणे भूमिका साकारणारे अष्टपैलू अभिनेते आहेत. नलावडे यांचा प्रवास बेस्टच्या आंतरविभागीय एकांकिका स्पर्धा, विविध लोकप्रिय एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा असा सुरु झाला आणि त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीवर नलावडे यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटविली. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवत आपल्या कलेचा ठसा थेट ऑस्करच्या नामांकनापर्यंत पोहोचविला. २००३ मध्ये त्यांचा श्वास (२००३) या चित्रपटाने मराठी चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळवून दिले. वारसा, ताटवा या चित्रपटांचे दिग्दर्शन करताना त्यांनी सामाजिक विषयाला चित्रपट माध्यमातून मांडण्यास विशेष महत्व दिले आहे.
सायरा बानो
हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळात ज्या अभिनेत्रीने आपल्या अदाकारीने एक वेगळीओळख निर्माण करुन दिली त्या म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो. सायरा बानो यांनी वयाच्या १७ व्या वर्षी हिंदी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले. १९६१ साली त्यांनी प्रथमच शम्मी कपूर यांच्यासोबत जंगली या चित्रपटातून कारकीर्दीला प्रारंभ केला. या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटासाठी सायरा बानो यांना फिल्म फेअर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनंतर त्यांनी अभिनय केलेले अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. १९६० ते १९७० च्या दशकात त्यांनी एक यशस्वी अभिनेत्री म्हणून त्यांची कारर्कीर्दरसिकांच्या विशेष स्मरणात राहिली.
जॅकी श्रॉफ
मुंबईतील तीन बत्तीसारख्या वस्तीमध्ये लहानपण घालविलेले बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा प्रवासही संघर्षाचा ठरला. आपल्या अभिनयाने रसिकांची नेहमीच दाद मिळविणारे जॅकी श्रॉफ यांचे महाविद्यालयीन शिक्षण विल्सन महाविद्यालयात झाले. महाविद्यालयात असतानाच जॅकी श्रॉफ यांनी मॉडेलिंगला सुरुवात केली. देवानंद दिग्दर्शीत स्वामी दादा (१९८२) या चित्रपटात खलनायक म्हणून अभिनय कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यानंतर सुभाष घई निर्मित हिरो (१९८३) ला चित्रपटाच्या यशाने जॅकी श्रॉफ ख-या अर्थाने स्टार झाले. जॅकी श्रॉफ यांच्या वाटचालीतील तेरी मेहरबानीया, अंदर-बाहर, रिटर्न ऑफ ज्वेलथीफ, काश, राम लखन, कर्मा, रंगीला इत्यादी महत्वाच्या चित्रपटातून त्यांनी विविधरंगी महत्वाच्या भूमिका साकारल्या. चित्रपटाच्या सेटवर कर्मचारी वर्गाशी देखील मिळून मिसळून वागणे हे जॅकी श्रॉफ च्या स्वभावाचे खास वैशिष्ट्य आहे. काही मराठी चित्रपटातही त्यानी भूमिका साकारलेली आहे.
राज्य शासनाच्या वतीने यंदा ५४ व्या राज्य मराठी चित्रपट महोत्सवाचे वांद्रे रिक्लेमेशन, म्हाडा मैदान क्र. १, वांद्रे पश्चिम येथे आयोजन करण्यात आले आहे. या पारितोषिक वितरण सोहळ्यात या जीवनगौरव व विशेष योगदान पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे