रत्नागिरी, (आरकेजी) : कोकण रेल्वे मार्गावर धावणार्या राज्यराणी एक्सप्रेस मध्ये आज पहाटे एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. तिने एका बाळाला जन्म दिला. मुंबई ते संगमेश्वर असा प्रवास ती करत होती. रेल्वे प्रशासन, गाडीतील महिला प्रवासी आणि संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे बाळ आणि माता दोघेही सुखरुप आहेत.
नंदा रवींद्र येडगे (25 /सध्या रा. मुंबई मुळ गाव येडगेवाडी, संगमेश्वर) ही ९ महिन्यांची गर्भवती महिला आपल्या नातेवाईकांसह बाळंतपणासाठी राज्यराणी एक्सप्रेस ने प्रवास करत होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास गाडीने चिपळूण सोडल्यावर नंदाला प्रसूती कळा येऊ लागल्या, हे समजताच नातेवाईक धास्तावले. मात्र डब्यातील सहकारी महिला प्रवाशांनी त्यांना धीर दिला. सहाच्या सुमारास गाडी आरवली स्टेशन जवळ येताच नंदा गाडीतच प्रसूत झाली. याची माहिती तत्काळ स्टेशन मास्तराना देण्यात आली.
संगमेश्वर रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात १०८ या आपत्कालीन रुग्णवाहिकेस फोन केला व अवघ्या काही मिनिटात वैदयकिय अधिकाऱ्यांसह रुग्णवाहिका संगमेश्वर स्थानकावर पोहोचली. प्रसूत महिला व नवजात बाळ यांच्यावर डॉ. शहाजी मोटे यांनी उपचार केले. त्यांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले गेले.
बालकाच्या नावाबाबत उत्सुकता
दोन वर्षात कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वेत दोन महिला प्रसूत होण्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र त्या महिलांना मुलगी झाली होती. दोन्ही मुलिंचे नाव संबंधितानी कोकणकन्या असे ठेवले होते. आज रेल्वेत प्रसूत झालेल्या नंदा यांना मुलगा झाला. त्यामुळे त्याचे नाव काय ठेवणार याची अनेकांना उत्सुकता लागून राहीली आहे.