रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्काच्या रत्नागिरी विभागाने धडक कारवाई करत मद्यसाठ्यासह एकूण ७ लाख ३१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल व दोन मारूती ओमनी व्हॅन जप्त करण्यात आल्या आहेत. चिपळूण तालुक्यात एकूण तीन ठिकाणी हि कारवाई करण्यात आली. फरशी तिठा (ता. चिपळूण) आणि कोंडमळा-सावर्डे (ता. चिपळूण) याठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली.
३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर गोवा बनावटीचा विदेशी मद्यसाठा चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर आणला जातो. त्यातच गावठी दारूची चोरट्या मार्गाने ठिकठिकाणी नेली जाते. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून महामार्गावर ठिकठिकाणी गस्ती पथक तैनात करण्यात आली आहेत. तसेच सर्व वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने चिपळूण तालुक्यातील फरशी तिठा येथे काल (गुरूवारी) रात्री केलेल्या कारवाईत संशयित आरोपी राजेश प्रभाकर हरचिलकर याच्या गाडीतून गोल्डन एस फाईन व्हिस्कीच्या ७५० मिली क्षमतेच्या १२ सीलबंद बाटल्या भरलेले बॉक्स असे एकूण ५० बॉक्समधील ६०० प्लास्टिक बॉटल असा एकूण ३ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
त्यानंतर त्याचठिकाणी केलेल्या दुसऱ्या कारवाईत ओमनी चालक दीपक महादेव उत्तेकर (४०, कुरवळ-जावळी, ता. खेड) याच्याकडून १७ हजार ५०० रूपये किंमतीची ३५० मिली क्षमतेची गावठी दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईत वाहनासह १ लाख ९५ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
दरम्यान कोंडमळा- सावर्डे येथे आज(शुक्रवार) सकाळी ९.१० ते १०.१० यावेळेत सुनील सुभाष सावर्डेकर (३०, रा. निवाचीवाडी, चिपळूण) याला रंगेहात पकडून त्याच्या ताब्यातून २६ हजार ४०० रूपये इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये २० लिटर मापाचे गावठी हातभट्टी दारूने भरलेले २ प्लास्टिक कॅन तसेच गोल्डन एस ७५० मिली क्षमतेच्या ४० बॉटल जप्त करण्यात आले आहेत.
या कारवाईत तीन संशयित आरोपींकडून ३९० लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच ४८० मिली गोवा बनावटीचे विदेशी मद्द तसेच दोन मारूती ओमनी व्हॅनसह एकूण रूपये ७ लाख ३१ हजार ९०० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. राज्य उत्पादन शुल्काच्या विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी विभागाच्या अधीक्षिका संध्याराणी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या पथकामध्ये प्रभारी निरीक्षक प्रमोद कांबळे, खेडचे प्रभारी निरीक्षक महेश शेंडे, चिपळूणचे प्रभारी निरीक्षक मेहबूब शेख, दुय्यम निरीक्षक विनोद इंजे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक विजय हातिसकर, राजेंद्र भालेकर, जवान महादेव चौरे, अर्वद शेख, अतुल वसावे, निनाद सुर्वे, सावळाराम वड, संदीप विटेकर यांचा सहभाग होता.