
रत्नागिरी : पूरपरिस्थितीमुळे सांगली, सातारा, कोल्हापूर येथील अनेक गावं उद्धवस्त झाली आहेत. या पूरस्थितीतून या गावांना सावरण्यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे. मागितलेली सहा हजार कोटींची मदत अपूर्ण असून ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार पुर्णतः अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी केला आहे. रत्नागिरी जिल्हा बँकेच्या नुतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी तटकरे बुधवारी रत्नागिरीत आले होते, यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पूरस्थितीवरून सरकारवर ताशेरे ओढले..
पुरामुळे घरं, शेती उदध्वस्त झाली असताना 6800 कोटीमध्ये कसं भागणार? असा सवाल सुनील तटकरे यांनी उपस्थित केला आहे. पुरात मेलेल्या पशुधनाची विल्हेवाट लावणे सगळ्यात मोठं काम आहे. दरम्यानच्या या सरकारने या अशा परिस्थितीत ज्यांना परिस्थितीचा प्रदीर्घ अनुभव आहे असे आमचे नेते शरद पवार यांच्या अनुभवाचा उपयोग करून घेणं आवश्यक आहे, असा सल्लाही तटकरे सरकारला दिला आहे. पवार साहेब मुख्यमंत्री असताना १९८९ सालात आलेल्या पुराचा त्यांनी सतत दौरा केला. हवाई दौरा त्यांनी केला नाही. उलट देशाच्या पंतप्रधानांना त्यावेळी पुर परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आणले. आता तर नुकसानीचे प्रमाण मोठं आहे. त्यामुळे कुठल्या बेरजा मारून सरकारने मदत मागितली याचा अंदाज मला नाही अस सांगत तटकरे यांनी पुरपरिस्थितीवरून फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, याबाबत बोलताना तटकरे म्हणाले की हे सरकार पूरग्रस्तांची चेष्टा करण्यात मश्गुल आहे. स्वतःची प्रतिमा आणखी वेगळी आहे हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न सरकारचा आहे. या सरकारला गांभीर्यच नसून महाजन यांच्या सेल्फीचं समर्थन हे अयोग्यच असल्याची टीका तटकरे यांनी केली आहे.
तसेच कोकणातील भातशेती पुरामुळे उध्वस्त झाली आहे. त्यामुळे कोकणालाही भरीव मदत मिळाली पाहिजे तसेच शेतीसाठी हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळाली पाहिजे अशी मागणी तटकरे यांनी केली आहे. हे सरकार संवेदनाहीन आहे, कारण कोकणात पूरपरिस्थिती असतानाही सरकारमधील एकही नेता कोकणात फिरकलाच नाही.. त्यामुळे हे सरकार संवेदनाहीन असल्याचा आरोप देखील सुनील तटकरे यांनी केला.














