मुंबई (प्रतिनिधी): शासनाच्या विविध विभागांनी मुंबई महापालिकेची ३२० कोटींची पाणीपट्टी थकवली आहे. म्हाडा, आरोग्य, गृह विभाग, ग्राम विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींचा यात समावेश आहे. म्हाडाने सर्वाधिक १६ हजार ६७५.१९ कोटी थकविल्याचे शिवसेनेचे म्हणणे आहे.
शासनाच्या विविध विभागाकडे पालिकेची पाणीबिलापोटी शेकडो कोटींची थकबाकी आहे. ही थकबाकी वसूल करावी, अशी मागणी नगरसेवकांकडून सातत्याने सुरु आहे. पालिकेनेही याबाबत पाठपुरावा केला. मात्र शासनाने अद्याप ही थकबाकी दिली नाही. दरम्यान, सुधार समिती अध्यक्ष अनंत नर यांनी मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रातील पोलीस वसाहती, शासकीय वसाहती, इमारती, कार्यालये आदींच्या पाण्याच्या थकीत बिलांबाबतची माहिती मागितली होती. पालिकेचे जलअभियंता अशोककुमार तवाडीया यांनी दिलेल्या माहितीतून शासनाच्या विविध विभागाकडे ३१ ऑक्टोबर २०१७ पर्यंत सुमारे ३२० कोटी ९८ लाख ४३ हजार एवढी थकबाकी असल्याचे उघडकीस आले आहे. सर्वाधिक १६ हजार ६७५.१९ कोटींची थकबाकी म्हाडाकडे आहे. गृह विभागाकडे ७३०२ कोटी, ग्राम विकास विभागाकडे ४५४१.०८ कोटी, प्रधान सचिव वन विभाग ७१८.०९,सार्वजनिक आरोग्य विभाग ७०९.४६ कोटी, सार्वजनिक बांधकाम विभाग ६९४.११ कोटी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय व दुग्ध विकास ५३३.९५ कोटी तर नगर विकास विभागाकडे ५१५ .५३ कोटींची थकबाकी असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. शिक्षण, महसुल, विधी व न्याय विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडेही पाणी बिलापोटी कोट्यावधींची थकबाकी असल्याचे तवाडीया यांनी नमूद केले आहे. दरम्यान, मुंबईतील विभागांची, नागरिकांची पाणी बिलाची थकबाकी वसूल करताना त्यांची जलजोडणी न तोडता पाणीबिल वसूल करावे, असे निर्देश अनंत नर यांनी प्रशासनाला दिले आहेत.