Mumbai : कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती “कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं” अशी झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी बुधवारी केली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. उपाध्ये म्हणाले की, राज्यात कठोर निर्बंध लावले जाणार असून केवळ आठवड्याच्या अखेरीस शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन असेल असे सरकारमधील चार-चार मंत्र्यांनी विविध वृत्तवाहिन्यावर सांगितले होते. जनतेच्या हिताचा सारासार विचार करून हा निर्णय घेतला असल्याचेही या मंत्र्यांनी आवर्जून सांगितले होते. मात्र, मंगळवारी राज्यभरातली गोंधळाची परिस्थिती पाहता राज्य सरकारने विरोधी पक्षांसह जनतेची सुद्धा फसवणूक केल्याचे दिसून आले. पोलिस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात बाजारपेठा, दुकाने बंद केल्याचे चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. महाविकास आघाडी सरकारला कठोर निर्बंध लावायचे आहेत की लॉकडाऊन असा सवाल उपाध्ये यांनी उपस्थित केला.
श्री. उपाध्ये म्हणाले की, राज्यावरील हे संकट टळण्यासाठी जबाबदार विरोधी पक्ष म्हणून सरकारला साथ देण्यास भाजपा तयार आहे मात्र, सरकारने सामान्य, गोरगरीब, कष्टकरी वर्गाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने या वर्गाला आर्थिक मदत द्यावी असे भाजपाने सुचवले होते. मात्र, रविवारी आपला निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसले आहेत. या संकट काळात जनतेचे काय हा साधा प्रश्नही त्यांना पडत नसावा काय? सरकार एवढे निर्दयी कसे असू शकते?
श्री. उपाध्ये म्हणाले की, राज्यातले अर्थचक्र गतिमान करण्याच्या गप्पा मारणाऱ्या या वसूली सरकारने अप्रत्यक्ष लॉकडाऊन लावून अर्थव्यवस्थेचे चक्र पूर्णत: ठप्प केले आहे. तसेच या कठिण काळात सरकारने वीज बिलांची वसूली थांबवण्याचा निर्णय घेणे अपेक्षित होते मात्र सरकारने त्याकडेही दुर्लक्ष केले आहे. केवळ जनतेची पिळवणूक हेच या सरकारचे धोरण आहे हे आता स्पष्ट होते.