रत्नागिरी (आरकेजी): महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेने आपल्या न्याय मागण्या तातडीने मान्य व्हाव्यात यासाठी विभागीय कार्यालयासमोर सोमवारपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार संघटनेने केला आहे.
एसटी परिवहन विभागातील अधिकार्यांकडून इतर संघटनांच्या सभासदांना त्रास देणे व त्यांच्यावर अन्याय करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. या प्रकारांना वेळीच आवर घालावा. त्याचबरोबर आगारामध्ये अन्यायी नेमणूक झालेल्या स्त्री कर्मचार्यांना विभागीय कार्यशाळा रत्नागिरी येथे तातडीने नेमणुका देण्यात याव्यात, शीटमेटल ट्रेड असलेल्या कर्मचार्यांची तातडीने विभागीय कार्यशाळा रत्नागिरी येथे नियुक्ती करावी, परजिल्ह्यातील स्त्री कर्मचार्यांचा छळ करणार्यांवर कारवाई करावी, लेडीज रुममध्ये गैरवर्तन करणार्या लिपिकावर कारवाई करावी या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. याबाबतचे निवेदन २१ एप्रिल २०१८ रोजी यंत्र अभियंता (चालन) यांना देण्यात आले होते. मात्र, यावर योग्य ती कार्यवाही न झाल्याने संघटनेच्या सदस्यांनी दि. २८ मेपासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
या ठिय्या आंदोलनात उल्हास पालकर, अमोल जाधव, जयप्रकाश दळवी, अनंत शितप, अजय खेडस्कर, बाबासाहेब गुरव आदींसह ३० ते ४० सदस्य सहभागी झाले आहेत.