मुंबई : राज्य आर्थिकदृष्ट्या स्थिर असून गुंतवणुकीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. बँकींग क्षेत्रातील तज्ज्ञांनी राज्याच्या प्रगतीसाठी करावयाच्या आर्थिक उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारा आयोजित ‘बँकींग अँड इकॉनॉमी कॉन्क्लेव’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्टेट बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. बँकींग क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. महाराष्ट्राची प्रगतीकडे वाटचाल याअंतर्गत अनेक विषयांवर स्टेट बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक पी. के. गुप्ता यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी आपली मते मांडली.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन असून राज्याने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहे. या उपक्रमांना जगभरातून गुंतवणूक करण्यास गुंतवणूकदार तयार आहेत. देशात होणाऱ्या थेट परकीय गुंतवणूकीत ५४ टक्के गुंतवणूक ही राज्यात होत आहे. देशातील बँकांनीही राज्यातील प्रकल्पांसाठी गुंतवणूक वाढविण्यासाठी हातभार लावावा.
इज ऑफ डुईंग बिझनेस, नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार योजना यासारख्या महत्वाकांक्षी योजनांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरु करण्यात आले आहेत. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे २४ शहरांना जोडणारा सर्वात मोठा रस्ता तयार होत आहे. यामुळे मुंबई-नागपूर हे अंतर केवळ आठ तासात गाठता येणार आहे. यामुळे दळणवळण यंत्रणेत सुधारणा होऊन याचा फायदा उद्योगांना होणार आहे. हा देशातील अत्याधुनिक मार्ग असणार आहे. यावर वाहकरहित वाहन चालविणे देखील शक्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
कृषीविषयक परिस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, सन २०२० पर्यंत २० हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत गेल्या दोन वर्षांत १२ लाख हेक्टर जमीन ओलिताखाली आणणे शक्य झाले आहे. पूर्वी सहा लाख टँकर्सने गावांना पाणीपुरवठा करावा लागत होता. यावर्षी केवळ ५०० टँकर्स पुरेसे ठरले. गेल्या काही वर्षांत उद्भवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. मात्र कर्जमाफी हा तात्पुरता उपाय असून कृषी क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक होणे आवश्यक आहे. कृषी क्षेत्रातील शाश्वत गुंतवणूक वाढावी यासाठी बँकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.