नवी दिल्ली : लोकमान्य टिळकांच्या योगदानावर आधारित `बाळ गंगाधर टिळक’ या महाराष्ट्राच्या चित्ररथाला शनिवारी सर्वोत्तम पथसंचलनाचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कँन्टॉनमेंट बोर्डाच्या रंगशाला सभागृहात आज झालेल्या सोहळ्यात संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव संजय भोकरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या पथ संचलनातील चित्ररथ पुरस्कार विजेत्या राज्यांना भामरे यांनी पुरस्कार वितरित केले. लोकमान्य टिळकांच्या १६० व्या जयंती निमित्त यावर्षी महाराष्ट्रच्याने टिळकांच्या जीवनावर आधारीत ‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक’ हा चित्ररथ सादर केला.
शुक्रवारी उशिरा रात्री संरक्षण मंत्रालयाच्यावतीने राजपथावरील चित्ररथ पथसंचलनाचा निकाल जाहीर करण्यात आला. अरूणाचल प्रदेश (प्रथम), त्रिपुरा (द्वितीय) तर महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला.
प्रशस्तीपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावर्षी राजपथावर १७ राज्यांचे आणि ६ केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण २३ चित्ररथ प्रदर्शित करण्यात आले होते. अरूणाचल प्रदेशच्या वतीने राजपथावर ‘याक नृत्य’ प्रदर्शित करण्यात आले होते. त्रिपुराच्या चित्ररथाच्या माध्यमातून ‘रियांग’ हे आदिवासी नृत्य प्रदर्शित करण्यात आले होते.
पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी संरक्षण राज्य मंत्र्यांनी प्रत्येक राज्याच्या कलाकारांच्या चमूची भेट घेतली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
राजपथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाची गौरवशाली परंपरा कायम
महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने दिल्लीतील राजपथावर राज्याचे वैशिष्ट्य दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची दीर्घ परंपराआहे. १९८० मध्ये ‘शिवराज्याभिषेक’ या चित्ररथास तसेच १९८३ मध्ये ‘बैल पोळा’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यानंतर ‘लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे शताब्दीवर्ष’, ‘हापूस आंबा’, ‘बापू स्मृती’ या चित्ररथांनी १९९९३ ते १९९५ असे सलग तीन वर्ष महाराष्ट्राला प्रथम पारितोषिकाचा बहुमान मिळवून दिला. १९८६ मध्ये ‘भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील महाराष्ट्राचे योगदान’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक प्राप्त झाले होते. १९८८ मध्ये राज्याच्यावतीने प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘लोकमान्य टिळकांवरील ऐतिहासीक खटला’ यास द्वितीय पारितोषीक मिळाले होते. २००७ मधे ‘जेजुरीचा खंडेराय’ या चित्ररथास तृतिय तर 2009 मधे ‘धनगर’ या चित्ररथास द्वितीय पारितोषीक मिळाले आहे.
२०१५ मध्ये सादर करण्यात आलेल्या ‘पंढरीची वारी’ या चित्ररथास प्रथम क्रमांक मिळाला होता. यावर्षी तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राने राजपथावरील चित्ररथांची गौरवशाली परंपरा कायम ठेवली आहे.