
रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील पारंपारिक विरुद्ध पर्सेसीन मच्छिमारांमधील वाद पुन्हा उफाळला आहे. पारंपारिक मच्छिमारांना जशात तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा रत्नागिरी जिल्ह्यातील पर्सेसीन मच्छिमार संघटनेने दिला आहे. कायद्याने आम्हाला समुद्रात १२ नाॅटिकल मेलाच्या बाहेर मच्छिमारी करण्याची परवानगी आहे. पण पर्सेसीन धारकरांवर पारंपारिक मच्छिमार दबाव टाकून कारवाई करायला भाग पाडत असल्याचा आरोप पर्सेसीन मच्छिमारांनी केला आहे. राजकीय नेत्यांनी आम्हाला संपवण्याचा विडाच उचलला आहे. आधी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबवा मग मासेमारीवर वक्तव्य करा, असा सल्ला देत पारंपारिक मच्छिमारांचे आंदोलन ही एक नौटंकीच आहे. पर्ससीन मच्छिमारांवर अन्याय झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा मच्छिमार नेते नासीर वाघू यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
जिल्ह्यात पारंपारिक विरूद्ध पर्ससीन असा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. या वादात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून गुरूवारी पर्ससीननेटधारक मच्छिमारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पर्ससीन मच्छिमारांचे सल्लागार ऍड. मिलिंद पिलणकर, राष्ट्रवादीचे नेते बशीर मुर्तुझा, रत्नागिरी तालुका पर्ससीन असो. चे अध्यक्ष विकास उर्फ धाडस सावंत, उपाध्यक्ष विजय खेडेकर, प्रतिक मोंडकर यांच्यासह पर्ससीन मासेमारी करणारे मच्छिमार यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मच्छिमार नेते नासिर वाघू म्हणाले की, पारंपारिक मच्छिमारांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून पर्सेसीन मच्छिमारांचा व्यवसाय बुडवण्याचा डाव आखला आहे. आम्हाला संपविण्याचा डाव राजकीय नेत्यांनी आखला आहे. पर्ससीनवर बोलणार्या आ. सदाभाऊ खोत व आ. बच्चू कडू यांनी आधी शेतकर्यांच्या आत्महत्या थांबविण्याकडे लक्ष द्यावे व त्यानंतरच पर्ससीनवर भाष्य करावे, असा सल्ला वाघू यांनी यावेळी दिला.
हर्णै येथील मच्छिमारांचे आंदोलन म्हणजे नौटंकी होती. चार महिने गुजरात, गोवा, कर्नाटक येथील नौका एलईडी मासेमारी करीत होत्या. त्यावेळी आंदोलनकर्ते झोपले होते का? असा सवाल उपस्थित करीत शिमगा जवळ आला की त्यांना रत्नागिरी बंदर दिसते असा आरोपही वाघू यांनी यावेळी केला.
प्रत्येकवेळी पर्ससीनवर निर्बंध घातले जातात. १२ नॉटिकल बाहेर मासेमारी करण्याची परवानगी या काळात असतानादेखील मासेमारी नियमांची अपुरी माहिती असलेल्या अधिकार्यांकडून चुकीच्या पद्धतीने कारवाई केली जात आहे. हा प्रकार असाच सुरू राहिल्यास रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करू असा इशाराच नासीर वाघू यांनी यावेळी दिला.
तसेच मत्स्य आयुक्त आणि मत्स्य अधिकारी सुडबुद्धीने पर्सेसीन बोटींवर कारवाई करत असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेत करण्यात आला.
देशाचा विकास व्हायचा असेल तर विकसित गोष्टींवर घातलेली बंधने उठविणे गरजेचे आहे. पर्ससीन मासेमारी म्हणजे विकसित मासेमारी आहे. पर्ससीनवर होणारी कारवाई म्हणजे चिरीमिरीसाठी केली जाणारी कारवाई असल्याचे पर्ससीन मच्छिमारांचे कायदेशीर सल्लागार ऍड. मिलिंद पिलणकर यांनी यावेळी सांगितले