मुंबई : महाराष्ट्राला शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा आहे. हा वारसा पुढे नेण्याची सर्वांची जबाबदारी आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सर्व समूहापर्यंत विकासाच्या योजना पोहोचविण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.पुराभिलेख संचालनालयाचे संचालक सुशील गर्जे यांनी संपादित केलेल्या ‘छत्रपती राजाराम महाराज यांचे विचार’ या ग्रंथाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते.मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, छत्रपती राजाराम महाराज यांच्या भाषणांचे संकलन होऊन त्याचे पुस्तक प्रकाशित होणे ही बाब अत्यंत आनंदाची आहे. 20 व्या शतकाच्या सुरुवातीला आधुनिक भारताची मुहूर्तमेढ कोल्हापूर येथील संस्थानात रोवण्यात आली. छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक, आर्थिक पातळीवर विकासाचा ध्यास घेत असताना समाजाच्या शेवटच्या घटकाला न्याय दिला पाहिजे, त्यांच्यापर्यंत योजना पोहोचल्या पाहिजेत ही भूमिका मांडून प्रत्यक्षात आणली. कोल्हापूर येथे विमानतळ बांधणे असो किंवा मग कोल्हापूरला रेल्वे आणणे असो यावरुन राज्याची औद्योगिक प्रगतीही महत्त्वाची असल्याचे त्यांनी ओळखले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांनी सामाजिक आणि आर्थिक न्याय काय असतो हे समजावून सांगितले. छत्रपती शाहू महाराज यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी हेच विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रुजविण्याचे काम केले. छत्रपती राजाराम महाराज यांनी प्रजेचे सुख हेच आपले अंतिम कर्तव्य मानले. त्यातून त्यांचे समाजाच्या उन्नतीसाठी असलेले विचार दिसून येतात. छत्रपती राजाराम महाराज यांची जनतेसाठी असलेली तळमळ नेमकी काय होती हेच आपल्याला या पुस्तकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या भाषणातून समजते. छत्रपती राजाराम महाराज यांनी 25 व्या वर्षी कारभार हातात घेतला आणि जवळपास 18 वर्षे कारभार केला. पण याच काळात त्यांनी शैक्षणिक क्षेत्र, सहकार, उद्योग, शेती , महिलांचे आरोग्य या क्षेत्रात काळाच्या पुढे जाऊन काम केले. शेतीसंदर्भातील वेगवेगळे प्रयोग, शाश्वत सिंचन पद्धत, जलयुक्त शिवार याचा त्यांनी जवळपास 100 हून अधिक वर्षांपूर्वी विचार केला यावरुन त्यांची दूरदृष्टी दिसून येते.