
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात प्रस्तावीत असलेल्या आॅईल रिफायनरी विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ रत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल्स लिमिटेड (आरआरपीसीएल) या कंपनीमार्फत राजापूरमध्ये माहिती देणारे काही बॅनर्स लावण्यात आले आहेत. हे बॅनर्स आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकानी फाडून जाळून टाकले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
राजापूर तालुक्यातील नाणार व इतर गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांचा प्रखर विरोध आहे. याच मुद्द्यावरून गेली दोन वर्षे राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. गेल्या महिन्यात आझाद मैदानात आंदोलनही झालं होतं. त्याच वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नाणार प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाला स्थगिती दिल्याची घोषणा केली होती.
असे असतानाही रिफायनरी प्रकल्प होण्याच्या अनुषंगाने रिफायनरी कंपनीच्या (आरआरपीसीएल) वतीने राजापूर शहरातील एस. टी. डेपो जवळ प्रथमच प्रकल्पाच्या समर्थनार्थ माहितीचा मोठा बॅनर लावण्यात आला होता. याच बॅनरवरून शिवसेना आज पुन्हा आक्रमक झाली. आमदार राजन साळवी यांनी शेकडो शिवसैनिकांना घेत हा बॅनर फाडून जाळून टाकला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिकांनी हे बॅनर्स जाळले. प्रकल्प रद्द झाला पाहिजे अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी शिवसेना राजापूर संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर, उपतालुकाप्रमुख तात्या सरवणकर, राजापूर पं. स. सभापती अभिजित तेली, उपसभापती प्रशांत गावकर, विभागीय संघटक उमेश पराडकर, राजापूर शहरप्रमुख संजय पवार, रत्नागिरी जि.प. माजी अर्थ व शिक्षण सभापती दीपक नागले, जि.प. सदस्या मंदाताई शिवलकर, शितलताई हर्डीकर, अभय चव्हाण, शरद लिंगायत, वसंत जडयार, विभागप्रमुख गणेश तावडे, जि. प. माजी सभापती दुर्वाताई तावडे ह्यांचेसह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.