रत्नागिरी : देशासह जगभरात प्रसिद्ध असलेल्या राजापुरातील गंगामाईचं आज सकाळी 6 वाजता आगमन झालं. 2019मध्ये 25 एप्रिल रोजी गंगामाई अवतरली होती. त्यानंतर यंदा वर्ष होण्यापूर्वीच गंगामाईचं आगमन झालं आहे.
एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण तीन वर्षांतून एकदा हा निसर्ग चमत्कार पहायला मिळतो. मात्र गेल्या काही वर्षांत गंगेच्या आगमन स्थितीत बदल झालेला आहे. गेल्या वर्षी तर दीड वर्षाने गंगामाई प्रकट झाली होती. यावर्षी वर्ष पूर्ण होण्याआधीच गंगामाईचं आगमन झालं आहे. एकूण १४ कुंडांंसह काशी कुंड आणि मूळ गंगा या ठिकाणाहून पाणी प्रवाहित होत असते. ही गंगा उगम पावते आणि साधारणपणे तीन महिने राहते. राजापुरात गंगेचे आगमन झाल्याची बातमी सर्वदूर पोहचताच अनेक भाविकांना ओढ लागते ती गंगेचे दर्शन घेऊन गंगेत स्नान करण्याची. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे त्यात संचारबंदीही आहे, गंगेच्या ठिकाणी फारसं कोणी फिरकलं नाही.
त्यात यंदा गंगा किती काळ राहणार? शिवाय, लॉकडाऊन हटल्यास त्याठिकाणी भाविकांची गर्दी होणार का? हे देखील पाहावं लागणार आहे.