
राजापूर जवळच्या उन्हाळे गावातील गंगातीर्थ क्षेत्र म्हणजे राज्याच्या कानाकोपर्यातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान. राजापूरची हि गंगा अनेकांसाठी गुढ मानली जात आहे. गंगा अवतरली की अनेक जण इथं दर्शनासाठी येत असतात. इथल्या गो मुखातून हे गंगेचं पाणी येतं. इथल्या गंगा कुंडात 10 नद्यांचं पाणी येतं असं सांगितलं जात. गंगा आली की इथल्या 14 कुंडात पाणी असतेच असते.
गंगामाईचे गतवर्षी 15 एप्रिल, 2020 मध्ये आगमन झाले होते. त्यानंतर अनेक दिवस वास्तव्य केल्यानंतर 21 जून रोजी गंगामाईचे निर्गमन झाले होते. त्यानंतर गंगास्थानी शुकशुकाट पसरलेला होता. त्यानंतर काल(गुरुवार) रात्री गंगामाईचे तब्बल 1 वर्ष 14 दिवसांनी (310 दिवस) उन्हाळे गंगातीर्थस्थानी आगमन झाले. गंगामाईचे आगमन झाल्यानंतर गंगामाई चांगली प्रवाहीत असून सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाण चांगले आहे. गायमुखही सध्या प्रवाहीत आहे. गंगामाईच्या पाण्याने पवित्र स्नान करण्यासाठी राज्यासह राज्याबाहेरील भाविक मोठ्यासंख्येने गंगेच्या वास्तव्याच्या काळात या ठिकाणी येतात. गंगामाईचे आगमन आणि निर्गमनाचे विज्ञानालाही कोडे सुटलेले नाही. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात 15 एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले होते. त्यानंतर यावर्षीही पंधरा दिवसांनी पुढे म्हणजे 30 एप्रिल रोजी गंगामाईचे आगमन झाले असून वर्षभरामध्ये एकाच महिन्यामध्ये पंधरा दिवसांच्या फरकाने गंगामाईचे आगमन झाले आहे. गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदी असल्याने भाविकांना गंगामाईच्या पवित्र पाण्याने स्नान करण्याची संधी हुकली होती. त्या स्थितीमध्ये यावर्षीही बदल झालेला नसून कोरोनाच्या दुसर्या लाटेत लॉकडाऊन आणि संचारबंदी जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावर्षीही भाविकांना गंगास्नानाची पर्वणी साधण्याची संधी हुकणार आहे.