रत्नागिरी, प्रतिनिधी : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. दरम्यान रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्याने यावर्षी दुसर्यांदा शहराला वेढा घातला आहे. रात्रीपासून राजापूर शहरातील जवाहर चौकामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झाली. सध्या जवाहर चौक पुराच्या पाण्याने वेढलं आहे. साधारण तीन फुटापर्यंत हे पाणी असण्याची शक्यता आहे. राजापुरातील अर्जुना आणि कोदवली नदीला पूर आला आहे. त्यामुळे नगरपरिषदेनं देखील नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करत सतर्कतेचा इशारा दिला आहे. चौकात पाणी आल्यानं आता व्यापाऱ्यांनी आपल्या सामानाची हलवाहलव करत ते सुरक्षित ठिकाणी नेलं.
दरम्यान राजापूर शहरातील बंदरधक्का, मुन्शीनाका परिसर, वरचीपेठ परिसर, शिवाजीपथ आदी भाग पूराच्या पाण्याखाली आहे. तर, शहरालगतचा शीळ, गोठणेदोनिवडे-चिखलगाव आदी गावांचा संपर्क तुटला आहे. तर, उन्हाळे, दोनिवडे पंचक्रोशीतील गावांना जोडणारा रस्ताही पाण्याखाली गेल्याने त्या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली आहे. दरम्यान, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, तहसिलदार प्रतिभा वराळे आदींनी शहरातील पुरस्थितीची पाहणी करून लोकांसह व्यापार्यांना सतर्कततेचा इशारा दिला आहे.
दरम्यान मुसळधार पावसामुळे गावांमधीलही जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पुराच्या पाण्यात एकजण गेला वाहून
राजापूरमध्ये पुराच्या पाण्यात एकजण वाहून गेला आहे. कोंढेतड पुलाजवळून आज सकाळी 7.30 च्या सुमारास एकजण वाहून गेला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.















