
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे. अनेक भागात बिबट्यांचं दर्शन होत आहे. दरम्यान राजापूर शहरात भरवस्तीत बिबट्याचं दर्शन होत असल्यामुळे खळबळ माजली आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राजापूर शहर परिसरात बिबट्याचं दर्शन होत आहे. विशेष म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील शासकीय विश्रामगृह परिसरात बिबट्याचा वावर हा पाहावयास मिळत आहे. सोमवारी रात्रीही या परिसरात बिबट्याचं दर्शन झालं. रस्ता ओलांडताना या बिबट्याला काही वाहनचालकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बिबट्याच्या या दर्शनामुळे राजापूर शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे…दोन दिवसांपूर्वी शहरातील भटक्या कुत्र्यांवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली होती. त्यामुळे या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वन विभागाकडे होत आहे.
भक्ष्याच्या शोधात अनेक वेळा बिबटे मानवी वस्तीत येतात. कुत्र्याचा पाठलाग करताना बिबटे विहिरीमध्ये पडल्याच्या घटनाही वारंवार घडल्या आहेत. मात्र आता शहरासारख्या ठिकाणी बिबटे येऊ लागल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या परिसरात वनविभागाने सापळा लावावा अशी मागणी होत आहे.















