राजापूरमधल्या दसूर आणि परुळे गावातील घटना
रत्नागिरी, (आरकेजी) : गेल्या चोवीस तासांत राजापूर तालुक्यातील दसूर आणि परुळे अशा दोन गावात विहिरीत पडलेल्या दोन बिबट्याना जेरबंद करून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलं आहे. दसूरमध्ये आज(मंगळवार) सकाळी सात वाजता विहिरीतून बिबट्याला बाहेर काढण्यात आलं तर परुळे गावातल्या एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला दुपारी दीड वाजता सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.
राजापूर तालुक्यातील दसूर गावातील कमलाकर अर्जून सुर्वे यांच्या घराजवळील विहिरीत सोमवारी रात्री भक्षाच्या शोधात असलेला बिबट्या पडला. रात्री साडेबाराच्या सुमारास सुर्वे यांना विहिरीत हा बिबट्या दिसून आला. त्यानंतर ही बातमी संपूर्ण गावामध्ये पसरली आणि लोकांनी बिबट्याला पाहण्यासाठी सुर्वे यांच्या विहिरीजवळ एकच गर्दी केली होती. दरम्यान याच गावातील राकेश सुर्वे यांनी रत्नागिरीचे वनक्षेत्रपाल बी आर पाटील यांना या घटनेची माहिती दूरध्वनीवरून कळवली. त्यानंतर राजापूरच्या वनपाल श्रीमती आर सी कीर, वनरक्षक एस एम रणधीर, व्हि जे कुंभार, पी एन डोईफोडे, एन एस गावडे, हि सर्व वनविभागाची टीम पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु झाले. सुरुवातीला बिबट्या पिंजऱ्यात शिरण्यास काही तयार नव्हता. पण अखेर पाच तासानंतर या बिबट्याला आज(मंगळवार) सकाळी 7 वाजता पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. जेरबंद करण्यात आलेला हा बिबट्या नर असून त्याचं वय अंदाजे 4 ते 5 वर्ष असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान दसूरमधील बिबट्याला सुरक्षित अधिवासात सोडून आल्यानंतर दुपारी साडेबारा वाजता वनक्षेत्रपाल बी आर पाटील यांना राजापूर तालुक्यातीलच परुळे गावात एका विहिरीत बिबट्या पडला असल्याची माहिती मिळाली. चंद्रकांत हरी खापणे यांच्या विहिरीमध्ये हा बिबट्या पडला होता. या घटनेची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल पाटील आपल्या टीमसह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं. हा बिबट्या नर असून तो अंदाजे 5 ते 6 वर्षांचा असल्याची माहिती वनक्षेत्रपाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान याही बिबट्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला सुरक्षित अधिवासात सोडण्यात आलं.