रत्नागिरी (आरकेेजी): राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी विरोधात पुकारलेल्या बंदला आज राजापूरवासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. मच्छिमार, शेतकरी संघटनेसह ‘शिवसेना, स्वाभिमान पक्ष, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आदी राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. संपूर्ण शहरात आज शुकशुकाट दिसून आला.
नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या पेट्रोकेमिकल प्रकल्पाला १४ गावातील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाच्या निषेधार्थ राजापूर वासियांनी बंदची हाक दिली होती. या हाकेला राजापूर तालुक्याने चांगला प्रतिसाद दिला. राजापूर शहराची मुख्य बाजारपेठ, पाचल बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. राजापूरचे आमदार राजन साळवी या बंद मध्ये सहभागी झाले होते. सकाळपासून त्यांनी देखील ग्रामस्थांसोबत राजापूर बाजारपेठ तसेच परिसरात फिरून आढावा घेतला. जनतेला रिफायनरी प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीची यावेळी राजन साळवी यांनी जाणीव करून देत १०० टक्के बंद पाळण्याचे आवाहन केले.