
रत्नागिरी, प्रतिनिधी : राजापूर तालुक्यातील अर्जुना नदीत एकजण वाहून गेल्याची घटना घडली आहे. रायपाटण गांगणवाडी येथे ही दुर्घटना घडली. विजय शंकर पाटणे ( ७० रा . खेड ) हे पुराच्या पाण्यात वाहून गेले. ते रायपाटण गांगणवाडी येथे नातेवाईकांकडे आले होते. सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान ते अर्जुना नदीकिनारी गेले असता पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलिस निरिक्षक जनार्दन परबकर यांनी दिली. दरम्यान पाटणे यांचा शोध सध्या सुरू आहे.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर राजापूर तालुक्यात पुन्हा सुरू झालेल्या संततधार पावसाने अर्जुना आणि कोदवली नद्यांना पुर आला आहे. दरम्यान पुराच्या पाण्याने पुन्हा एकदा शहर बाजारपेठेत शिरकाव केला आहे. सोमवारी सकाळी पुराच्या पाण्याने जवाहरचौकातील ध्वजस्तंभाला वेढा दिला .