रत्नागिरी (आरकेजी): रत्नागिरी नगरपरिषदेवर शिवसेनेने पुन्हा भगवा फडकवला. प्रभाग ३ मधील पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार राजन शेट्ये १८९ मतांनी विजयी झाले. शेट्ये यांचा विजय होताच शिवसैनिकांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला. त्यांना ९८६ मते, भाजपचे उमेदवार वसंत पाटील यांना ७९७ मते तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार सानीफ गवाणकर यांना १०१ मते मिळाली.
राजेश सावंत यांनी राजीनामा दिल्याने प्रभाग क्रमांक तीन मधील एका जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. या एका जागेसाठी शिवसेनेकडून राजन शेट्ये, भाजपकडून वसंत पाटील तर काँग्रेस आघाडीकडून सनीफ गवाणकर रिंगणात होते. ६ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी ५७.२१ टक्के मतदान झाले. १ हजार ९०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. निवडणुकीपुर्वी तिन्ही उमेदवारांनी जोरदार प्रचार केला होता. भाजपनेही यात मुसंडी मारली होती. गुरुवारी मतमोजणी झाली. शिवसेनेने यात बाजी मारली. मात्र अपेक्षेइतकी मते शेट्ये यांना पडली नाहीत. भाजप आणि शिवसेना उमेदवारांमध्ये जोरदार चुरस झालेली पाहायला मिळाली. दरम्यान, प्रभाग तीन हा सेनेचा बालेकिल्ला असून मागील निवडणुकीत शिवसेना उमेदवार तब्बल साडेसहाशे मतांनी निवडून आले होते.